पुणे शहरी भागात प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांच्या सोईसाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार एकाच कुटुंबात एकापेक्षा जास्त लाभार्थी या योजनेचे असल्यास व त्यांची जागा सामाईक असल्यास अशा पात्र लाभार्थ्यांना त्या जागेवर बहुमजली इमारत बांधण्यास परवानगी दिली आहे.
केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना शहरी भागात राबविण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. कुटुंब हा या योजनेचा घटक असल्याने कुटुंबाची व्याख्याही या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आली आहे. या योजनेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांकडे स्वत:च्या मालकीची जागा असेल, तर त्या जागेवर घरकुल बांधण्यासाठी त्यांना अनुदान दिले जाते. चार वर्षांपूर्वी राज्य सरकारने त्यात सुधारणा केली. त्यानुसार प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पात्र कुटुंबातील सज्ञान कमावता व्यक्ती हा या योजनेसाठी पात्र ठरविण्यात आला आहे. परंतु एकत्र कुटुंब पद्धतीमुळे कुटुंबप्रमुखांच्या नावावरच संपूर्ण जागा असल्याने कुटुंबातील इतर पात्र लाभार्थ्यांना जागा नावावर नसल्यामुळे या योजनेचा लाभ घेता नसल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला. याबाबतचा आदेश गृहनिर्माण विभागाचे कार्यासन अधिकारी राजू अंबाडेकर यांनी काढला आहे.
(हेही वाचा – मुंबईच्या समुद्र किनारी भारतीय नौदलाचे कोसळले हेलिकॉप्टर, तिघांना वाचवण्यात यश)