लसीकरण जलदगतीने राबवण्यासाठी धर्मगुरुंचा पुढाकार; मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला मिळाली धर्मगुरुंची साथ

मुंबई महानगरातील गोवरची साथ नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणावर भर दिला जावा. रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या बालकांची विशेष काळजी घ्या, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी गोवर साथ नियंत्रण आढावा बैठकीत केली. गोवर प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी धर्मगुरुंची मदत घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी करताच पालिका अधिका-यांनी गोवंडीतील तब्बल ४० धर्मगुरुंची सभा घेऊन लसीकरणासाठी साहाय्य करण्याची विनंती केली. धर्मगुरु आता प्रार्थनेच्यावेळी लसीकरणाबाबत माहिती देण्यासाठी तयार झाले आहेत.

( हेही वाचा: गोवरमुळे सहा महिन्यांच्या चिमुकलीचा बळी )

या बैठकीला वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार, आरोग्यमंत्री गिरीश महाजन, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव आदी उपस्थित होते. गोवरचा उद्रेक झालेल्या ठिकाणी स्थानिक नेते आणि धर्मगुरुंची मदत घेऊन लसीकरण मोहिमेबाबत जनजागृती करा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. लसीकरणासाठी ९०० केंद्रे सुरु करण्यात आल्याची माहिती बैठकीला उपस्थित पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिली. लसीकरणाच्या समन्वयासाठी अधिकारीही नियुक्त करण्यात आल्याची माहिती यावेळी चहल यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. पालिका अधिका-यांनी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार, गुरुवारी धर्मगुरुंची बैठकही घेतली. तब्बल ४० धर्मगुरु शुक्रवारच्या प्रार्थनेच्यावेळी उपस्थित लोकांना लसीकरणाबाबत आवाहन करणार आहेत. सायंकाळी उशिराने पालिका आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बालकांच्या लसीकरणासाठी नकार देणा-या पालकांची समजूत घालण्यासाठी खासगी रुग्णालयात कार्यरत असणा-या डॉक्टरांचाही समाविष्ट करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here