हॉटेल तडकामधून रेमडेसिवीरचा साठा जप्त!

पोलिसांनी असल्फा येथील हॉटेल तडका येथे छापा टाकून हॉटेलच्या स्वयंपाक घरातील फ्रीजमधून रेमडेसिवीरच्या २० वायल्स हस्तगत केल्या.

87

हॉटेल ‘तडका’च्या स्वयंपाकघरात रेमडेसिवीर इंजेक्शन ठेवून त्याची काळ्याबाजारात विक्री करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या कक्ष १२च्या पथकाने अटक केली आहे. या टोळीत हॉटेल ‘तडका’चे मालक आणि एका कथित समाजसेविकेचा समावेश आहे.

समाजसेविकासह दोघे जण ताब्यात 

मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष १२ चे प्रभारी पोलिस निरीक्षक महेश तावडे यांच्या पथकाने गोरेगाव येथे राहणाऱ्या स्नेहा शाह या महिलेसह दोघांना रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करताना ताब्यात घेण्यात आले होते. या दोघांकडून पोलिसांनी रेमडेसिवीरच्या सहा वायल्स हस्तगत केल्या होत्या. गोरेगाव येथे राहणाऱ्या स्नेहा शाह ही स्वत:ला समाजसेविका असल्याचे सांगते. तिच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी असल्फा व्हिलेज येथील हॉटेल ‘तडका’ येथून रेमडेसिवीर मिळवले असल्याची माहिती दिली.

(हेही वाचा : लॉकडाऊनच्या काळात सरकारला तारले दारूने! तिजोरीत १५,०९० कोटी जमा! )

गुजरातमधील व्यक्ती पुरवठा करायची!

पोलिसांनी असल्फा येथील हॉटेल तडका येथे छापा टाकून हॉटेलच्या स्वयंपाक घरातील फ्रीजमधून २० वायल्स हस्तगत करून हॉटेल तडकाच्या मालक कांबळेसह तिघांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. चौकशीत हे रेमडेसिवीर गुजरात राज्यातील प्रकाश नावाची व्यक्ती पुरवठा करीत होती. दरम्यान या टोळीकडून रेमडेसिवीर विकत घेणारी व्यक्ती समोर आली असून त्याने यांच्याकडून ६ वायल्स विकत घेतल्या होत्या, त्यादेखील पोलिसांनी जप्त केल्या असून जप्त करण्यात आलेले ३२ वायल्स एफडीएच्या ताब्यात देण्यात आलेल्या असल्याची माहिती प्रभारी पोलिस निरीक्षक महेश तावडे यांनी दिली. याप्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात कलम १८८, ४२०, ३४ भादंविसह परिच्छेद २६ औषध किंमत नियंत्रण आदेश २०१३, सह वाचन कलम ३ (२) (सी) जीवनाश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे उल्लंघन, दंडनीय कलम ७ (१) (ए) (II) तसेच औषधे व सौंदर्य प्रशासन कायदा १९४० चे कलम १८ (ए) (vi) सहवाचन नियम ६५ चे उल्लंघन दंडनीय कलम २७ (डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती तावडे यांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.