चेंबूरमध्ये २३ महिन्यांमध्ये जलवाहिन्यांवरील साडे चारशे गळत्यांची दुरुस्ती

प्रातिनिधीक छायाचित्र

चेंबूर, टिळक नगरमधील गळक्या जलवाहिनींचा शोध घेऊन २३ महिन्यांमध्ये तब्बल ४५२ जलवाहिनींची दुरुस्ती करण्यात आली आहे. तर सिमेंट काँक्रिटीकरणामुळे तसेच पावसाळी पाणी वाहून जाणाऱ्या नाल्यांमधून जाणाऱ्या १० जलवाहिन्या बदलून अन्य जागांवर स्थलांतरीत करण्यात आल्याने या भागातील पाणी समस्येचे निवारण करण्यावर महापालिकेने भर दिल्याचे दिसून येत आहे.

कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली

महापालिकेच्या एम पश्चिम विभागातील जलवाहिन्यांच्या जाळ्यांमधून होणारी पाण्याची गळती थांबवणे, गळक्या जलवाहिनींमधून होणाऱ्या दुषित पाण्याचा पुरवठा, अपुऱ्या पाण्याचा पुरवठा याशिवाय गंजलेल्या व जुन्या जलवाहिन्या बदलणे आदी कामे युध्दपातळीवर करण्यासाठी महापालिकेने २४ ऑगस्ट २०२० पासून ३१ जुलै २०२२पर्यंत कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली होती. या कालावाधीमध्ये या भागात पाण्याचा पुरवठा करण्यासाठी विद्यमान गळत्या दूर करण्याची कामे हाती घेण्यात आली आहे. त्यात ४५२ विद्यमान जलवाहिन्यांमधील गळत्या दूर करण्यात आल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.

(हेही वाचा रिचा चड्डाच्या देशविरोधी वक्तव्याचे काँग्रेस नेत्या अभिनेत्री नगमाकडून समर्थन)

साडेसात कोटी रुपये खर्च केले जाणार

याशिवाय जलवाहिनींमधून होणाऱ्या दुषित पाण्याची समस्या निकालात काढण्यासाठी हाती घेतलेल्या कामांमध्ये जुन्या आणि गंजलेल्या १९ जलवाहिन्या बदलण्यात आल्या आहेत. याशिवाय जलवाहिन्यांवरील झडपा बसवणे, त्यांची दुरुस्ती करणे, कॅमेराद्वारे जलवाहिन्यांची पाहणी करणे आदी प्रकारच्या ८६ कामे करण्यात आल्याचाही दावा जल अभियंता विभागाने केला आहे. मात्र, यापूर्वी केलेल्या कामांच्या कंत्राटदाराचा कालावधी संपुष्टात आल्याने आता या कामांसाठी नवीन कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यानुसार ए.एस. के कंस्ट्रक्शन कंपनी ही पात्र ठरली असून पुढील दोन वर्षांकरता या जलवाहिनी दुरुस्ती तसेच नवीन जलवाहिनी बदलण्याकरता सुमारे साडेसात कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here