मुंबईतील वांद्रे किल्ल्याजवळ ट्रि हाऊस बांधण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्यानंतर आता वरळी किल्ल्याच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात येत आहे. कोस्टल रोडमुळे वरळी कोळीवाड्यातील मच्छिमार बांधवांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे. त्यामुळे या कोळीवाड्याच्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी वरळी किल्ल्याचे जतन व संवर्धनाची कामे करण्याचा निर्णय जी दक्षिण विभागाने घेतला आहे.
किल्ल्याच्या कामांसाठी ६३ लाख ४९ हजार रुपयांचा खर्च
राज्यातील पुरातत्व खाते अंतर्गत येत असलेल्या किल्ल्यांपैकी मुंबईतील वरळी किल्ला हा पुरातन ऐतिहासिक वारसा लाभलेला किल्ला आहे. हा वरळी किल्ला या राज्य संरक्षित स्मारकाचे स्थानिक शहर नियोजक, वास्तूविशारद यांच्यामार्फत पाहणी करण्यात आली होती. या स्थानिक शहर नियोजक, वास्तूविशारद यांनी वरळी किल्ल्याचे जतन व संवर्धन करणेबाबतचा आराखडा जी-दक्षिण विभागास सादर करण्यात आला. त्यामुळे जी दक्षिण विभागाच्यावतीने आराखडा बनवून त्यानुसार निविदा मागवली होती. पुढील सहा महिन्यांच्या कालावधीसाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात येत असून यासाठी देवांग कंस्ट्रक्शन ही कंपनी पात्र ठरली आहे. या कंपनीला किल्ल्याच्या कामांसाठी ६३ लाख ४९ हजार रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.
(हेही वाचा मुंबईच्या रस्त्यांच्या खोदकामावर ३८३ कोटींची मलमपट्टी: काळ्या यादीतील दोन कंपन्यांही ठरल्या पात्र)
पुरातन विभागातील सहाय्यक संचालक यांचे ना-हरकत
राज्य संरक्षित स्मारकाची जागा ही सहाय्यक संचालक, पुरातत्व विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या अखत्यारित येत असल्याने सदर कामी महाराष्ट्र शासनाच्या पुरातन विभागातील सहाय्यक संचालक यांचे ना-हरकत प्राप्त करण्यात आले आहे. वरळी किल्ल्याचे जतन व संवर्धनाकरीता स्थापत्य स्वरुपाची कामे केल्यास वरळी कोळीवाडा या राज्य संरक्षित स्मारकांच्या सौदर्यात भर पडेल व मुंबईतील पर्यटनास चालना मिळून मुंबईच्या वैभवात भर पडणार असल्याचे जी दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे यांनी स्पष्ट केले.
वरळी किल्ल्याचा इतिहास
वरळीचा किल्ला हा वरळी कोळीवाडा गावाच्या उत्तरेकडील टोकावर वसलेला आहे. दक्षिण मुंबईचे प्रवेशव्दार म्हणून ओळखले जाते. हा किल्ला पोर्तुगीजांनी सन १५६१ च्या सुमारास वरळी टेकडीवर बांधला, जेव्हा शहर फक्त सात बेटांनी बनले होते. हा किल्ला शत्रू जहाजे आणि समुद्री चाच्यांचा शोध म्हणून वापरला जात असे. किल्ल्यामध्ये एक विहीर, एक मंदिर आहे आणि किल्ल्यावरु तसेच, वांद्रे सागरी सेतू यांचे विहंगम दृश्य दिसते. किल्ल्याची तटबंदी हे तोफांसाठीचे व्यासपीट आहेत, भूतकाळातील त्यांच्या लष्करी महत्व असल्याची आठवण करून देतात. हा किल्ला मुंबईच्या पश्चिम किना-यावरील माहिमच्या खाडीपासून लक्ष्य वेधणा-या तीन किल्ल्यांपैकी एक आहे. ज्याच्या उत्तरेस माहिम किल्ला आणि वांद्रे किल्ला आहे.
Join Our WhatsApp Community