प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपतींकडून देशवासियांना शुभेच्छा; वाचा संपूर्ण भाषण

161

७४व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला, देश-विदेशात राहणाऱ्या सर्व भारतीयांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. संविधान लागू झाल्याच्या दिवसापासून आतापर्यंतचा आपला प्रवास विलक्षण राहिला असून यातून अनेक देशांना प्रेरणाही मिळाली आहे. प्रत्येक नागरिकाला भारताच्या यशोगाथेचा अभिमान आहे. प्रजासत्ताक दिन साजरा करताना, एक राष्ट्र म्हणून आपण सर्वांनी मिळून जे यश प्राप्त केले आहे, त्याचा उत्सव आपण साजरा करतो.

भारत जगातल्या सर्वात प्राचीन काळापासून नांदणाऱ्या संस्कृतींपैकी एक आहे. भारताला लोकशाहीची जननी म्हटलं जातं. तरीही आपलं आधुनिक प्रजासत्ताक युवा आहे. स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या काळात आपल्याला असंख्य आव्हानं आणि प्रतिकूल परिस्थितीला सामोरं जावं लागलं. दीर्घ परकीय राजवटीच्या अनेक दुष्परिणामांपैकी दोन परिणाम होते, ते म्हणजे हलाखीचं दारिद्र्य आणि निरक्षरता. मात्र तरीही भारत डगमगला नाही. आशा आणि विश्वास यांच्या बळावर आपण, मानव जगताच्या इतिहासातला अनोखा प्रयोग हाती घेतला. इतका विशाल आणि वैविध्य असणारा जनसमुदाय, एक राष्ट्र म्हणून बांधला जाणं हे केवळ अभूतपूर्व होतं. आपण सर्व एक आहोत आणि आपण सर्व भारतीय आहोत, हा विश्वास घेऊन आपण हे साध्य केलं. विविध पंथ आणि असंख्य भाषांमुळे आपण विभागले गेलो नाही, तर जोडले गेलो. म्हणूनच, प्रजासत्ताक लोकशाही म्हणून आपण यशस्वी ठरलो. हेच भारताचं मूलतत्व आहे.

हेच मूलतत्व संविधानाच्या केंद्रस्थानी राहिलं आहे आणि काळाच्या कसोटीवरही टिकून राहिलं आहे. स्वातंत्र्यलढ्यातल्या आदर्शांना अनुरूप, आपल्या प्रजासत्ताकाला बळ देणाऱ्या  संविधानाची निर्मिती करण्यात आली. महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय चळवळीचा उद्देश, स्वातंत्र्यप्राप्ती हा होताच, त्याचबरोबर भारतीय आदर्श पुन्हा स्थापन करण्याचाही होता. त्या दशकांमधल्या संघर्ष आणि बलिदानानं केवळ परकीय राजवटीपासून नव्हे तर आपल्यावर लादली गेलेली मूल्यं आणि संकुचित जागतिक दृष्टिकोनापासूनही स्वतंत्र होण्यासाठी बळ दिलं. शांतता, बंधुत्व आणि समानता या आपल्या शतकानुशतकांच्या  मूल्यांचा पुन्हा अंगीकार करण्यासाठी, क्रांतिकारक आणि सुधारकांनी, द्रष्ट्या आणि आदर्शवादी व्यक्तीत्वांबरोबर काम केलं. आधुनिक भारताच्या वैचारिक जडणघडणीला आकार देणाऱ्या या थोरांनी “आ नो भद्राः क्रतवो यन्तु विश्वत:” – अर्थात आमच्याकडे चोहो बाजूनी चांगले विचार यावेत – या वेदातल्या उपदेशाप्रमाणे पुरोगामी विचारांचंही स्वागत केलं. प्रदीर्घ आणि सखोल विचारमंथनातून आपलं संविधान तयार झालं.

आपला हा पायाभूत दस्तऐवज जगातल्या सर्वात प्राचीन संस्कृतीच्या मानवतावादी तत्वज्ञानाबरोबरच आधुनिक विचारांनीही प्रेरित आहे. आपला देश डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांचा नेहमीच ऋणी राहील, ज्यांनी मसुदा समितीची अध्यक्षता केली आणि संविधानाला अंतिम स्वरूप देण्यात महत्वाची भूमिका बजावली. संविधानाचा प्राथमिक मसुदा तयार करणारे कायदेतज्ञ श्री. बी. एन. राव आणि संविधाननिर्मितीत सहाय्य करणारे इतर तज्ञ आणि अधिकाऱ्यांचंही आज आपण स्मरण करायला हवं. या संविधान सभेच्या सदस्यांमध्ये भारताची सर्व क्षेत्रं आणि समुदायांचं प्रतिनिधित्व होतं, याचा आपल्याला अभिमान आहे. संविधाननिर्मितीत संविधान सभेच्या 15 महिला सदस्यांचंही योगदान राहिलं आहे.

संविधानात अंतर्भूत आदर्शांनी आपल्या प्रजासत्ताकाला नेहमीच मार्गदर्शन केलं आहे. या वाटचालीत आपल्या देशानं, गरीब आणि निरक्षर या स्थितीतून बाहेर पडून, आत्मविश्वासाने परिपूर्ण राष्ट्र म्हणून जागतिक पटलावर स्थान प्राप्त केलं आहे. संविधान निर्मात्यांच्या सामुहिक बुद्धिमत्तेतून मिळालेल्या मार्गदर्शनावाचून ही प्रगती शक्य नव्हती.

(हेही वाचा तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी गेलेल्या सोलापुरातील चौघांचा अपघाती मृत्यू)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अन्य थोर व्यक्तिमत्वांनी आपल्याला एक आराखडा आणि नैतिक चौकट दिली. त्यांनी घालून दिलेल्या मार्गावरून वाटचाल करणं हे आपलं कर्तव्य आहे. आपण बऱ्याच प्रमाणात या अपेक्षांची पूर्तताही केली आहे, मात्र गांधीजींचा ‘सर्वोदय’ अर्थात सर्वांचे उत्थान, हा आदर्श  वास्तवात आणण्याचं काम बाकी आहे, याची जाणीव आपल्याला आहे. तरीही सर्व आघाड्यांवर आपण उत्साहवर्धक प्रगती केली आहे.

प्रिय देशवासियांनो,

सर्वोदयाच्या ध्येयप्राप्तीमध्ये आर्थिक आघाडीवरची आपली प्रगती सर्वात उत्साहदायी आहे. गेल्या वर्षी भारत जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला. जगभरात आर्थिक आघाडीवर अतिशय दोलायमान वातावरणाच्या पार्श्वभूमीवर भारतानं ही कामगिरी केली आहे, हे अधोरेखित करणं गरजेचं आहे. वैश्विक महामारीचं हे चौथं वर्ष असून जगाच्या बहुतेक भागात आर्थिक विकासावर याचा विपरीत परिणाम झाला. सुरवातीच्या काळात  कोविड – 19 मुळे भारताच्या अर्थव्यवस्थेचीही मोठी हानी झाली. मात्र, समर्थ नेतृत्व आणि संघर्षशीलता यामुळे लवकरच यातून बाहेर पडत, आपण पुन्हा एकदा विकासगाथेच्या मार्गावर आलो. अर्थव्यवस्थेची बहुतेक क्षेत्रं महामारीच्या परिणामातून सावरली आहेत. भारत, जगातल्या सर्वाधिक वेगानं वाढणाऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. सरकारनं योग्य वेळी केलेल्या सक्रीय प्रयत्नांमुळेच हे शक्य झालं आहे. यापैकी ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाप्रती जनतेमध्ये  मोठा उत्साह दिसत आहे. याशिवाय विविध क्षेत्रात विशेष प्रोत्साहन योजनाही लागू करण्यात आल्या आहेत.

ही अतिशय समाधानाची बाब आहे की उपेक्षितांनाही योजना आणि कार्यक्रमात सामावून घेण्यात आलं असून, अडचणींतून बाहेर पडण्यासाठी त्यांना सहाय्य करण्यात आलं. कोविड – 19 च्या अभूतपूर्व उद्रेकाच्या काळात जेव्हा आपले देशवासी आर्थिक संकटाचा सामना करत होते, अशा काळात मार्च 2020 मध्ये जाहीर केलेल्या, ‘प्रधानमंत्री  गरीब कल्याण अन्न योजनेची’ अंमलबजावणी करत सरकारने, गरीब कुटुंबांच्या अन्न सुरक्षेची काळजी घेतली. या सहाय्यामुळे कोणालाही उपाशीपोटी राहावं लागलं नाही. गरीब कुटुंबांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देत या योजनेला लागोपाठ मुदतवाढ दिली गेली आणि  सुमारे 81 कोटी नागरिकांना याचा लाभ मिळत राहिला. हे सहाय्य आणखी वाढवत सरकारनं असं जाहीर केलं आहे की, 2023 या वर्षातही या लाभार्थींना त्यांचं मासिक रेशन मोफत मिळेल. हे  ऐतिहासिक पाऊल उचलत सरकारनं दुर्बल घटकांना आर्थिक विकासात सामील करून घेत असतानाच त्यांच्या देखभालीचं दायित्वही स्वीकारलं आहे.

(हेही वाचा लँड जिहादविरुध्द हिंदू समाज आक्रमक! धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा)

आपली अर्थव्यवस्था भक्कम पायावर उभी असल्यानं, स्तुत्य उपक्रमांची मालिकाच सुरु करून ती जारी राखणं आपल्याला शक्य झालं आहे. सर्व नागरिकांनी आपल्या वैयक्तिक आणि सामुहिक क्षमता पूर्ण उपयोगात आणत प्रगती साधावी यासाठी पोषक वातावरण निर्माण करणं हे आपलं अंतिम उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी शिक्षणच योग्य पाया घालतं म्हणून राष्ट्रीय शिक्षण धोरणात महत्वाकांक्षी परिवर्तन करण्यात आलं. आर्थिक तसंच सामाजिक सबलीकरण आणि सत्याचा शोध ही शिक्षणाची दोन मुख्य उद्दिष्टं असतात असं म्हणता येईल. राष्ट्रीय शिक्षण धोरणात या दोन्ही उद्दिष्टांची पूर्तता करण्याचा मार्ग प्रशस्त करण्यात आला आहे. हे धोरण, 21 व्या शतकातल्या आव्हानांसाठी विद्यार्थ्यांना सज्ज करतानाच, आपल्या संस्कृतीवर आधारित ज्ञानाला सध्याच्या जीवनासाठी समर्पक बनवतं. शिक्षण प्रक्रियेचा विस्तार आणि ही प्रक्रिया अधिक सखोल करण्यासाठी, तंत्रज्ञानाची महत्त्वपूर्ण भूमिका राष्ट्रीय शिक्षण धोरणात अधोरेखित करण्यात आली आहे.

कोविड-19 च्या सुरवातीपासूनच आपल्याला जाणीव झाली की जीवनात परिवर्तन घडवण्याची ताकद तंत्रज्ञानात आहे. ‘डिजिटल इंडिया’अभियानाअंतर्गत गाव आणि शहर यांच्यातली तफावत भरून काढून, माहिती आणि संपर्क तंत्रज्ञान समावेशक करण्याचा प्रयत्न होत आहे. दुर्गम भागातले अधिकाधिक लोक इंटरनेटचा लाभ घेत आहेत. पायाभूत सुविधांमध्ये झालेल्या विस्ताराच्या सहाय्यानं, सरकार देत असलेल्या विविध सेवा, लोकांना प्राप्त होत आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातली आपली कामगिरी अभिमानस्पद आहे. अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रात मोजक्या अग्रगण्य देशात भारताचा समावेश झाला आहे. या क्षेत्रात प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या सुधारणा करण्यात येत असून विकासाच्या या वाटचालीत सहभागी होण्यासाठी आता खाजगी उद्योगांना आमंत्रित करण्यात आलं आहे. भारतीय अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाण्यासाठी ‘गगनयान’ कार्यक्रम प्रगतीपथावर आहे. भारताची, मानवासह ही पहिली अंतराळ भरारी असेल. आकाशातल्या ताऱ्यांपर्यंत झेप घेऊनही आपलं वास्तवाचं भान कायम आहे.

भारताचे ‘मिशन मंगळ’ हे अलौकिक प्रतिभेच्या महिला चमूनं संचालित केलं  होतं आणि इतर क्षेत्रातही आपल्या भगिनी-कन्या मागे नाहीत. महिला सबलीकरण आणि स्त्री-पुरुष समानता आता केवळ घोषणा न राहता,  हा आदर्श गाठण्याच्या दिशेनं आपण लक्षणीय प्रगती केली आहे. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानात जनभागीदारीच्या बळावर प्रत्येक कार्यक्षेत्रात महिलांचं प्रतिनिधित्व वाढत आहे. राज्यांच्या दौऱ्यादरम्यान, शिक्षण संस्थांच्या कार्यक्रमात, विविध व्यावसायिक प्रतिनिधीमंडळांच्या भेटीदरम्यान, तरुणींचा आत्मविश्वास मला प्रभावित करतो. माझ्या मनात जराही शंका नाही की , उद्याचा भारत घडवण्यात महिलांचं योगदान सर्वाधिक असेल. राष्ट्रनिर्माणासाठी निम्म्या लोकसंख्येला आपल्या क्षमतेचा पुरेपूर वापर करत, योगदान देण्याची संधी मिळाली आणि त्यांना प्रोत्साहन देण्यात आलं तर कोणती गोष्ट अशक्य आहे ?

सबलीकरणाचा हाच दृष्टीकोन अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती तसंच दुर्बल घटकांसाठी सरकारच्या कार्य प्रणालीला दिशा देतो. खरं तर या लोकांच्या जीवनातल्या समस्या सोडवणं किंवा त्यांच्या विकासासाठी सहाय्य करणं इतकाच आपला उद्देश नसून या समुदायांकडून शिकणं हाही आपला उद्देश आहे. विशेषतः आदिवासी समुदाय, पर्यावरण संरक्षणापासून ते समाजाला अधिक एकजूट करण्यापर्यंत अनेक क्षेत्रात समृद्ध शिकवण देऊ शकतो.

प्रिय देशवासियांनो,

शासनाच्या सर्व पैलूंमध्ये परिवर्तन करण्यासाठी आणि लोकांच्या  सृजनात्मक सामर्थ्याला वाव देण्यासाठी अलीकडच्या काही वर्षात करण्यात आलेल्या प्रयत्नांमुळे जागतिक समुदाय भारताकडे सन्मानाच्या नव्या दृष्टीनं पाहत आहे. जागतिक पटलावरच्या विविध व्यासपीठांवर आपल्या सक्रीयतेमुळे सकारात्मक परिवर्तन सुरु झालं आहे. जागतिक पटलावर भारताने जो सन्मान मिळवला आहे त्यामुळे देशाकडे नव्या संधी आणि जबाबदाऱ्याही आल्या आहेत. आपण सर्वजण जाणताच की या वर्षी भारताकडे  G -20 देशांच्या गटाचं अध्यक्षपद आहे. विश्वबंधुत्वाच्या आपल्या आदर्शांना अनुरूप आपण सर्वांसाठी शांतता आणि समृद्धीची कामना करतो. G-20 चं अध्यक्षपद हे लोकशाही आणि बहुपक्षीयतेला प्रोत्साहन देण्याची उत्तम संधीही आहे, त्याचबरोबर एक उत्तम जग आणि उज्वल भविष्याला आकार देण्यासाठी  योग्य व्यासपीठही आहे. मला विश्वास आहे की अधिक न्याय्य आणि चिरंतन जागतिक व्यवस्था निर्माण करण्यासाठीच्या, G- 20 गटाच्या प्रयत्नांना भारताच्या नेतृत्वाखाली अधिक बळ मिळेल.

जगातल्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे दोन-तृतीयांश लोकसंख्या आणि जागतिक जीडीपीमध्ये सुमारे 85 टक्के वाटा, हा  G-20 सदस्य देशांचा आहे. म्हणूनच जागतिक आव्हानांवर चर्चा करण्यासाठी आणि त्यांच्या निराकरणासाठी हा एक आदर्श मंच आहे. मला वाटतं की जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदल ही अशी आव्हानं आहेत ज्यांचा तातडीनं सामना करणं गरजेचं आहे. जागतिक तापमानात वाढ होत असून हवामानात बदलाची तीव्र रूपं दिसू लागली आहेत. आपल्यासमोर एक गंभीर द्विधा परिस्थिती आहे; जास्तीत जास्त लोकांना दारिद्र्यातून बाहेर काढण्यासाठी आर्थिक विकास आवश्यक आहे, मात्र या विकासासाठी जीवाश्म इंधनाचा वापर करावा लागतो. दुर्दैवाने, जागतिक तापमानवाढीचा सर्वाधिक फटका गरीब वर्गाला झेलावा लागतो. उर्जेचे पर्यायी स्त्रोत विकसित करून ते लोकप्रिय करणे हाही एक उपाय आहे. सौरउर्जा आणि इलेक्ट्रिक वाहनांना धोरणात्मक प्रोत्साहन देऊन भारतानं या दिशेनं प्रशंसनीय पाऊल उचललं आहे. मात्र जागतिक स्तरावर, विकसित देशांकडून उदयोन्मुख अर्थव्यवस्थांना, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि वित्तीय सहाय्यतेद्वारे मदतीची आवश्यकता आहे.

विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखण्यासाठी, आपण प्राचीन परंपरांकडे नव्या दृष्टीनं पाहायला हवं. आपल्या मुलभूत प्राधान्यांवरही आपल्याला फेरविचार करायला हवा. परंपरागत जीवन मूल्यांचा वैज्ञानिक पैलू जाणून घ्यायला हवा. आपल्याला पुन्हा एकदा निसर्गाप्रती आदर आणि विशाल ब्रह्मांडाप्रती विनम्रतेचा भाव जागृत करायला हवा. मी याकडे आपलं लक्ष वेधू इच्छिते की, महात्मा गांधी खऱ्या अर्थानं आधुनिक युगाचे द्रष्टे होते, कारण बेसुमार औद्योगिकीकरणातून निर्माण होणाऱ्या समस्या, त्यांनी आधीच जाणल्या होत्या आणि जगाला आपल्या चलनवलनात परिवर्तन घडवण्याबाबत सावधही केलं होतं.

आपल्या मुलांनी या भूतलावर सुखकर जीवन जगावं अशी आपली इच्छा असेल तर आपल्याला जीवनशैलीत बदल घडवण्याची आवश्यकता आहे. यासंदर्भात सुचवण्यात आलेल्या बदलांमध्ये एक बदल आहाराशी संबंधित आहे. मला आनंद वाटतो की भारताने दिलेला प्रस्ताव स्वीकारत, संयुक्त राष्ट्रांनी, 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून जाहीर केलं आहे. बाजरीसारखी भरडधान्य आपल्या आहारातला मुख्य घटक होता. समाजातले सर्व वर्ग त्याला आता पुन्हा पसंती देऊ लागले आहेत. या धान्यपिकांसाठी पाणी कमी लागत असल्यानं, अशी धान्य पर्यावरणासाठी अनुकूल आहेत. पोषणमूल्यांच्या दृष्टीनेही ही धान्ये समृद्ध असतात. जर जास्तीत जास्त लोकांनी आपल्या आहारात भरड धान्यांचा समावेश केला तर पर्यावरण रक्षणाला हातभार लागेलच त्याचबरोबर लोकांचं आरोग्यही सुधारेल.

प्रजासत्ताकाचं आणखी एक वर्ष संपून एक नवं वर्ष सुरु होत आहे. हा काळ अभूतपूर्व परिवर्तनाचा राहिला आहे. महामारीच्या उद्रेकानं जगात काही दिवसातच उलथापालथ झाली. गेल्या तीन वर्षात जेव्हा जेव्हा आपल्याला वाटलं की, आपण या विषाणूला आटोक्यात आणलं, तेव्हा तेव्हा या  विषाणूनं  आणखी एखाद्या विकृत रुपात डोकं वर काढलं. मात्र आता याला घाबरण्याची आवश्यकता नाही. कारण आपण जाणलं आहे की आपलं नेतृत्व, आपले वैज्ञानिक आणि डॉक्टर, आपले प्रशासक आणि ‘कोरोनायोद्धे’ कोणत्याही परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. त्याच बरोबर आपण हा धडाही घेतला आहे की आपण काळजी घेण्यात कुचराई करणार नाही आणि सतर्कही राहू.

प्रिय देशवासियांनो,

विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेक पिढ्या आपल्या प्रजासत्ताकाच्या आतापर्यंतच्या यशोगाथेमधल्या बहुमोल योगदानासाठी प्रशंसेला पात्र आहेत. मी, शेतकरी, मजूर, वैज्ञानिक आणि अभियंते यांच्या भूमिकेची प्रशंसा करते, ज्यांचं  सामूहिक सामर्थ्य आपल्या देशाला ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान’ हा मंत्र अनुसरत, आगेकूच करण्यासाठी सक्षम करतं. देशाच्या प्रगतीत योगदान देणाऱ्या प्रत्येक नागरिकाची मी प्रशंसा करते. भारताच्या संस्कृतीचे सदिच्छादूत असणाऱ्या अनिवासी भारतीयांनाही मी अभिवादन करते.

याप्रसंगी आपल्या शूर जवानांची मी विशेष प्रशंसा करते, जे आपल्या सीमांचं रक्षण करतात आणि कोणत्याही त्याग आणि बलिदानासाठी सदैव सज्ज असतात. देशवासियांना अंतर्गत सुरक्षा पुरवणाऱ्या निमलष्करी आणि पोलीस दलाच्या सर्व बहादूर जवानांचीही मी प्रशंसा करते. आपली सैन्यदलं, निमलष्करी आणि पोलीस दलातल्या ज्या वीरांनी कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती दिली आहे त्या सर्वांना मी विनम्र नमन करते. मी सर्व बालकांना, त्यांच्या उज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक आशीर्वाद देते. आपणा सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.