मुंबईच्या रुग्णालयातील निवासी डॉक्टर का संतापले?

173

राज्यात सरकारी रुग्णालयांसह मुंबईतील पालिका रुग्णालयातील निवासी डॉक्टर्सही सोमवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. पालिकेच्या केईएम, नायर, कूपर तसेच सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या बेमुदत संपामागे नायर रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना पालिका प्रशासनाकडून मिळणारी दुर्लक्षित वागणूक कारणीभूत ठरली आहे. प्रलंबित कोविड भत्ता देण्याच्या आश्वासनांना कंटाळलेल्या नायरच्या निवासी डॉक्टरांचा वाद आता पालिका प्रशासकीय पातळीवर चर्चिला जात आहे.

( हेही वाचा : डॉक्टरांच्या संपामुळे ५० टक्के शस्त्रक्रिया रद्द; तोडगा न निघाल्यास अत्यावश्यक सेवेवरही परिणाम होण्याची शक्यता )

निवासी डॉक्टर संपावर

जानेवारी ते सप्टेंबर २०२२ या काळातील प्रत्येक महिन्याला कोविड रुग्णांच्या सेवेसाठी दिला जाणारा दरमहा दहा हजार रुपयांचा कोविड भत्ता नायरच्या निवासी डॉक्टरांना दिला गेलेला नाही. सप्टेंबर महिन्यात पालिकेच्या प्रमुख रुग्णालयाच्या संचालिका डॉ. नीलम अंद्रांदे यांनी आम्हाला या प्रकरणी सकात्मकता दर्शवली. भत्त्यावर वरिष्ठ अधिका-यांकडून स्वाक्षरीही झाल्याचे सांगितले. प्रत्यक्षात कोणत्याही कागदपत्रांवर स्वाक्षरी झालेली नसल्याचे आमच्या निदर्शनास आले, अशी माहिती नायर मार्डचे अध्यक्ष डॉ. चेतन अद्रात यांनी दिली. ही प्रक्रिया नायर प्रशासनातील अकाऊण्टंट विभागातून वेळेत झाली नसल्याची कबुली आम्हांला चौकशीअंती वरिष्ठांनी दिली. केवळ चर्चा आणि आश्वासनांवर हा बेमुदत संप मागे हटणार नाही अशी भूमिका नायरसह इतर पालिकेच्या रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी घेतली आहे. याबाबतीत प्रमुख रुग्णालयाच्या संचालिका डॉ. नीलम अंद्रादे यांनी बोलण्यास नकार दिला. याबाबतीत जनसंपर्क विभागाकडून माहिती पुरवली जाईल, असे त्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.