सीएसएमटीनंतर ‘या’ स्थानकांवर सुरू होणार ‘रेस्टॉरेंट ऑन व्हील्स’!

101

रेल्वे गाड्यांच्या जुन्या कोचला नवे रूप देत या माध्यमातून रेस्टॉरेंट ऑन व्हील्स ही संकल्ना अस्तित्वात आली. सीएसएमटी स्टेशनवर  प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या ‘रेस्टॉरेंट ऑन व्हील्स’चा उपक्रम यशस्वी झाला आहे. याच धर्तीवर आता मध्य रेल्वे मुंबई विभागासह महाराष्ट्रातील काही रेल्वे स्थानकांवर असा प्रयोग करण्यात येणार आहे. यासाठी निविदा काढण्यात आली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली आहे.

या स्थानकांचा समावेश

रेल्वेच्या अनेक जुने कोच असेच पडून असतात. या जुन्या कोचमध्ये काही बदल करून सीएसएमटी स्टेशनवर नुकतंच ‘रेस्टॉरेंट ऑन व्हील्स’ सुरू करण्यात आले. या रेस्टॉरेंटला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. असाच प्रयोग मध्य रेल्वेच्या अन्य काही स्थानकांवर करायचे ठरवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून नागपूरमध्ये अशा प्रकारचे रेस्टॉरेंट कोच बनवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. याशिवाय मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, इगतपुरी, लोणावळा, नेरुळ, नागपूर, आकुर्लीसह अन्य सहा स्थानकांवर हे रेस्टॉरेंट सुरू होणार आहेत.

( हेही वाचा : तब्बल 51 हजार 165 किमी लांबीचे 484 रेल्वे प्रकल्प प्रगतीपथावर )

सीएसएमटीवरील ‘रेस्टॉरेंट ऑन व्हील्स’

मुंबई सीएसएमटीवर ट्रेनच्या कोचमध्ये सुरू केलेल्या रेस्टॉरेंटमध्ये १० टेबलची व्यवस्था केलेली आहे. या रेस्टॉरेंटला सध्या चांगलीच पसंती मिळत आहे. हे हॉटेल सीएसएमटी स्थानकाच्या १८ नंबर प्लॅटफॉर्मसमोर सुरू आहे. या हॉटेलमध्ये जाण्यासाठी रेल्वेचे तिकीट असणे किंवा प्लॅटफॉर्म तिकीट असणे बंधनकारक नाही. त्यामुळे आपल्या रेल्वेची वाट बघत असलेल्या प्रवाशांसोबत बाहेरील नागरिक देखील या हॉटेलमध्ये जाऊन वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊ शकतात. एकूण चाळीस ग्राहकांची आसन क्षमता या हॉटेलमध्ये आहे.

नाश्त्यासह जेवणही मिळणार

रेल्वेच्या डब्यात सुरू करण्यात आलेल्या या हॉटेलमध्ये दोन विभाग आहेत. एका विभागात आपण बसून ऑर्डर देऊन खाऊ शकतो, तर दुसरीकडे उभ्याने वडापाव, सॅंडविच, ज्यूस, सॉफ्टड्रिंक असे पदार्थ खाऊ शकतो. अशा प्रकारचे रेल्वे डब्यात सुरू झालेले हॉटेल आसनसोल स्थानकात आहे. त्याच धर्तीवर मध्य रल्वेच्या सीएसएमटी स्थानकात दुसरे हॉटेल सुरू करण्यात आले आहे. या हॉटेलमध्ये आपल्याला वडापावपासून ते पंजाबी, चायनीज आणि दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ मिळतात. विकेंडला या रेस्टॉरेंटमध्ये सरासरी ४००, तर अन्य दिवशी २५० ते ३०० ग्राहक भेट देत असल्याची माहिती आहे. यामुळे चांगला महसूल मिळत असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.