वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील(राणी बागेतील) चार प्याऊ सध्या बंद पडल्या आहेत. परंतु या प्याऊंचा वापर पुन्हा एकदा पर्यटकांची तहान भागवण्यासाठी केला जाणार आहे. या चारही प्याऊंचा जीर्णोध्दार करुन त्यांना मूळ स्वरुपात कार्यान्वित केले जाणार आहे. या चारही प्याऊ वास्तू वारसा सूचित मोडत आहेत.
प्याऊंचा होणार जीर्णोद्धार
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात एकूण चार प्याऊ असून, त्यातील दोन प्याऊ हे अन्यत्र जागेवरुन उद्यानातील रोपवाटिकेमध्ये ठेवण्यात आले आहेत. या ४ प्याऊंपैकी ३ प्याऊंचा जीर्णोध्दार करुन प्याऊंच्या संरचनेचे मूळ सौंदर्य प्राप्त करुन दिले आहे. या प्याऊ उद्यानात येणाऱ्या पर्यटकांची तहान भागवण्याकरता असून, त्यांची जलजोडणी करण्यात येणार आहे. तसेच सिंहमुख असलेल्या चौथ्या प्याऊचा जीर्णोध्दार करुन, कासव संग्रहालयालगत असलेल्या उंचवट्यावरील छोटे तलाव व परिसराचे सुशोभीकरण करुन त्याचा कारंजा म्हणून वापर करण्यात येणार आहे.
(हेही वाचाः राणीबागेत आता मगर, सुसर यांना जवळून न्याहाळता येणार!)
२.२१ कोटींचा खर्च
या चारही प्याऊंचा जीर्णोध्दार तसेच त्यांना पुनर्जिवीत करण्यासाठी कंत्राटदाराची निवड करण्यात आली असून, यावर २.२१ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या कंपनीने यापूर्वी बाबुलनाथ मंदिराच्या जीर्णोध्दाराचे तसेच महाबळेश्वर येथील विला वास्तूच्या जीर्णोध्दार व पुनर्स्थापनाचे काम केले आहे.
पुरातन वैशिष्ट्य टिकवणार
यासंदर्भात माहिती देताना पुरातन वास्तू जतन कक्षाचे प्रमुख अभियंता संजय सावंत यांनी या प्याऊंचे पुरातन वास्तू म्हणून वैशिष्ट्य टिकवून ठेवण्यासाठी जीर्णोध्दाराचा भाग म्हणून, जिथे-जिथे सामग्री मोडली आहे किंवा खराब झाली आहे, तिथे त्याचप्रकारचे नवीन घटक बसवण्यात येणार आहेत. या उद्यानातील सेठ समलादास प्याऊचा योग्य नळ यंत्रणा वापरुन, तसेच कोई मासे असलेल्या गोलाकार तलावाचा विकास करुन पाण्याचा कारंजा म्हणून वापर केला जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या प्याऊ आणि कोई तलावाच्या सभोवतालचा परिसर रमणीय बनवला जाईल. तेथील जागेवर लाद्या किंवा क्राँकीटीकरण करुन तसेच पायऱ्या तयार केल्या जाणार असल्याचेही नमूद केले आहे.
(हेही वाचाः ‘मोनोरेल’चे चीफ ऑपरेटिंग अधिकारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल!)
Join Our WhatsApp Community