आता लोकलवर निर्बंध?

लोकल पूर्ण बंद करावी किंवा लोकल सेवेवर निर्बंध आणावेत, यावर राज्य सरकारचा विचार सुरु आहे.

86

राज्यासह मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णाचे आकडे वाढत असून, लोकलमधील गर्दी हे देखील कोरोना रुग्ण वाढीचे प्रमुख कारण असल्याचे समोर येत आहे. यावरून आता राज्य सरकार पुन्हा लोकलवर निर्बंध घालावे का? याचा विचार करत आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, लोकल पूर्ण बंद करावी किंवा लोकल सेवेवर निर्बंध आणावेत, यावर राज्य सरकारचा विचार सुरु आहे. लवकरच याचा विचार केला जाईल, असे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

राज्यात तसेच मुंबईत कोरोना संसर्ग वाढत आहे. सामान्यांचा रोजगार बुडत होता म्हणून मागच्या वर्षी लोकल बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सध्या लोकांची गर्दी होत आहे. त्यामुळे या गर्दीवर नियंत्रण कसे आणावे याचा देखील विचार राज्य सरकार करत आहे.  त्यामुळे लोकलवर नव्याने निर्बंध लागू केले तर ते कोणते असतील, याबद्दलसुद्धा अनेक तर्क लावले जात आहेत.

तो तर निर्णय केंद्रांचा!

दरम्यान रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी खासगीत बोलले असता त्यांनी राज्य सरकारने लोकलबाबत अजून आमच्याशी चर्चा केली नसून, लोकलबाबत जर एखादा निर्णय घ्यायचा असेल, तर तो संपूर्ण रेल्वे बोर्डाचा अधिकार असतो, तसेच हा निर्णय केंद्रातून घेतला जाईल, असे देखील या अधिकाऱ्याने सांगितले.

(हेही वाचा : …तर मुंबईत शनिवारपासून लसीकरण पूर्णपणे ठप्प!)

रेल्वे-राज्य सरकारमध्ये पुन्हा रंगणार का वाद?

दरम्यान याआधी नवरात्रीनिमित्त मुंबई आणि एमएमआर भागातल्या महिलांना लोकलमधून प्रवास करण्याबाबत राज्य सरकारने परिपत्रक काढले होते. त्यावेळी देखील रेल्वेने हात झटकल्याने वाद निर्माण झाला होता. रेल्वेने सेवा सुरू करण्यास असमर्थता दर्शवली होती. केंद्राची परवानगी आणि तयारी करण्यास वेळ लागेल, असे सांगत लोकल सेवा सुरू करणे शक्य नसल्याचे पश्चिम रेल्वेने राज्य सरकारला पत्राद्वारे कळवले होते. साहजिकच नवरात्री निमित्ताने राज्य सरकारने महिलांना दिलेल्या या विशेष भेटीवर विरजण पडले होते.

मुंबईने चिंता वाढवली!

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लोकसंख्येची घनता जास्त असल्यामुळे येथे रोज हजारोंच्या संख्येने नवे रुग्ण आढळत आहेत. येथे बुधवारी, 7 मार्च रोजी एका दिवसात तब्बल 10,428 नवे कोरोना रुग्ण आढळले होते. तर दिवसभरात येथे 6,007 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. या आकडेवारीनुसार मुंबईत सध्या 80,886 बाधितांवर उपचार सुरु आहेत. सध्या मुंबईत कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 80 टक्के असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा 35 दिवसांवर आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.