कांदिवलीतील उंच झोपड्यांना लागणार चाप

102

मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांच्या बांधकामांवर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश असतानाही, याकडे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. परंतु मालाड येथील घटनेतून बोध घेत, आता कांदिवलीतील उंच झोपड्यांच्या बांधकामांना चाप लावण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे या भागातील १४ फुटांवरील बांधकाम केलेल्या झोपड्यांचा, तसेच गाळ्यांचा सर्वे करुन त्यांना नोटीस जारी करण्याचे निर्देश, या विभागाचा पदभार स्वीकारताच सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर यांनी दिले आहेत. त्यामुळे या झोपड्यांचे सर्वे करुन पावसाळ्यानंतर या वाढीव बांधकामांवर कारवाई केली जाणार आहे.

मेहतांचे आदेश

मुंबई महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजोय मेहता यांनी १ ऑक्टोबर २०१६ रोजी मासिक आढावा बैठकीत सर्व विभागीय सहाय्यक आयुक्तांना, महापालिकेच्या ज्या भूखंडावरील सर्वेक्षण पूर्ण झाले आहे, अशा भूखंडावरील झोपड्यांबाबत कारवाई सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्याआधी त्यांनी मुंबईतील ज्या भागांमध्ये झोपडपट्ट्या आहेत, ज्यांची उंची १४ फुटांपेक्षा अधिक आहे, त्यांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यातील काही भागांचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्यानंतर, त्यांनी हे कारवाईचे आदेश दिले होते. पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या भूखंडावरील सर्वेक्षण झालेल्या झोपडपट्ट्यांची कारवाई आणि त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारितील भूखंडावरील १४ फुटांपेक्षा अधिक उंची असणाऱ्या झोपड्यांचेही सर्वेक्षणक करून, तो अहवाल संबंधित जिल्हाधिकारी यांना देऊन त्यांनाही या प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे, असेही आदेश तत्कालीन आयुक्तांनी दिले होते.

मोहीम गुंडाळली

त्यानंतर महापालिकेच्या भूखंडावरील काही विभागांमध्ये असणाऱ्या झोपड्यांवरील कारवाई हाती घेण्यात आली. परंतु काही झोपड्यांवरील कारवाई झाल्यानंतर ही मोहीमच गुंडाळण्यात आली. पण मालाड येथील दुघर्टनेनंतर झोपड्यांच्या वाढीव बांधकामांचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कारवाईचे आदेश

दरम्यान, विभागीय सहाय्यक आयुक्तांची खांदेपालट झाली असून, नवीन विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आता सहाय्यक आयुक्तांनी पुन्हा नव्या जोमाने काम करायला सुरुवात केली आहे. कांदिवली आर दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर, संध्या नांदेडकर यांनी मालाड दुघर्टनेच्या पार्श्वभूमीवर कांदिवली भागातील झोपड्यांच्या वाढीव बांधकामांवर चाप लावण्याचा निर्धार केला आहे. याबाबत विभागातील किती झोपड्यांचे बांधकाम १४ फुटांपेक्षा अधिक आहे, त्यांचा सर्वे करून त्यांना नोटीस दिली जावी,असे निर्देश त्यांनी दिले आहेत. महापालिकेच्या जुन्या परिपत्रकानुसार ही कारवाई केली जाणार असून, सध्या सर्वे करून त्यानुसार वाढीव बांधकामांवर कारवाई केली जाणार असल्याचे नांदेडकर यांनी हिंदुस्थान पोस्टशी बोलतांना स्पष्ट केले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.