महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत महापालिकेच्या सर्व शाळांच्या निकाल सरासरी ८४.७७ टक्के एवढा लागला आहे. त्यात महानगरपालिकेच्या एकूण ४३ शाळांचा निकाल १०० टक्के लागला. या परीक्षेत महापालिकेच्या शाळांमधून गुंदवली एमपीएस शाळेचा विद्यार्थी शुभम अवधेश सिंग याने ९५.२० टक्के गुण मिळवत अव्वल क्रमांक मिळवला आहे.
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, सह आयुक्त (शिक्षण) अजित कुंभार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजू तडवी आदींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेला महानगरपालिकेच्या २४५ माध्यमिक शाळांमधून १७ हजार १४० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १४ हजार ५२९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर ५० विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. महानगरपालिका शिक्षण विभागाने दहावीच्या निकाल वाढीसाठी विद्यार्थ्यांची तयारी करुन घेतली होती. प्रत्येक विद्यार्थ्याला दहावीच्या परीक्षेत यश मिळावे, यासाठी अत्यंत सोप्या व मोजक्या आशयाच्या ‘मिशन-३५’ पुस्तिका विद्यार्थ्यांकडून सोडवून घेतल्या होत्या.
विद्यार्थ्यांचा अधिकाअधिक सराव होण्याकरिता डिसेंबर २०२२ पासून बोर्डाच्या धर्तीवर शालेय स्तरावर सराव प्रश्नपत्रिका सोडवून घेण्यात आल्या होत्या. याशिवाय अधिकाऱ्यांना शाळा दत्तक देऊन मार्गदर्शन करण्यात आले होते. तसेच शिक्षक आणि विद्यार्थांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थी, शिक्षक, पालक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षणीय यंत्रणा यांच्यामध्ये समन्वय साधून वेळोवेळी सहविचार सभाही घेण्यात आल्या. शिवाय, र्व्हच्युअल क्लास रुम ( व्हिटीसी) मार्फत तज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात आली होती.
पहिल्या २५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक अर्थसहाय्य
दहावीच्या परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे महानगरपालिका शाळेतील पहिल्या २५ विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील पाच वर्षाच्या शिक्षणासाठी प्रत्येकी किमान रुपये २५ हजार आर्थिक सहाय्य देण्यात येईल. मागील वर्षीच्या शैक्षणिक वर्षात महानगरपालिका शिक्षण विभागाने नवीन प्रवेशाकरिता ‘मिशन ॲडमिशन, एकच लक्ष्य- एक लक्ष’ ही मोहीम राबविल्यामुळे १ लाख पेक्षा प्रवेश निश्चित झाले होते. २०२३-२४ साठी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्याकरीता ‘मिशन मेरीट’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community