आपल्या मुलांसाठी ‘आरटीई’ प्रवेश अर्ज केलात का? १२ एप्रिलला कळेल सोडतीचा निकाल

152

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठीची ‘आरटीई’ २५ टक्के प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन सोडत (लॉटरी) बुधवारी, ०५ एप्रिल २०२३ रोजी पुणे येथील ‘महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद’ येथे काढण्यात आली आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ व राजू तडवी यांनी दिली आहे. या सोडतीसाठी मुंबईतून एकूण १८ हजार २०७ वैध अर्ज प्राप्त झाले होते. गेल्यावर्षी हीच संख्या १५ हजार ५० इतकी होती. आरटीई अंतर्गत मुंबईत ६ हजार ५६९ जागा उपलब्ध आहेत. येत्या १२ एप्रिल पासून दुपारी तीन नंतर सोडतीत पात्र ठरलेल्या पाल्याचे नाव पालकांच्या मोबाइल फोनवर समजू शकेल.

( हेही वाचा : धक्कादायक! पुण्यात महिलेसह तिच्या दोन मुलांची चुलत दिराने केली हत्या )

‘बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९’ अर्थात ‘आरटीई’ नुसार दुर्बल व वंचित घटकातील पाल्यांना संबंधित निकषांनुसार विविध शाळांमध्ये प्रवेश देण्यात येतो. गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही ही कार्यवाही ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना शिक्षण खात्याद्वारे कळविण्यात आले आहे की, या सोडतीअंती तयार करण्यात आलेली निवडयादी व प्रतिक्षा – यादी ही
https://student.maharashtra.gov.in किंवा http://education.maharashtra.gov.in
या संकेतस्थळावर १२ एप्रिल २०२३ रोजी दुपारी ३.०० नंतर उपलब्ध असणार आहे. तसेच निवड यादीतील व प्रतिक्षा यादीतील बालकांच्या पालकांना लघुसंदेश (SMS) देखील पाठविण्यात येणार आहेत. पहिल्या फेरीचे प्रवेश हे १३ एप्रिल ते २५ एप्रिल दरम्यान होतील. तरी पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी पडताळणी समिती व शाळेशी संपर्क साधून आपल्या पाल्याचा शाळा प्रवेश निश्चित करावा.

बुधवारी पुण्यात आयोजित सोडत कार्यक्रमाला शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, प्राथमिक शिक्षण संचालनालय, शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी, राष्ट्रीय माहिती केंद्रातील संबंधित तज्ज्ञ, पत्रकार, पालक आणि विविध संघटना व संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच मुंबई महानगरपालिकेचे अधीक्षक (शाळा) निसार खान हेदेखील यावेळी उपस्थित होते.

सोडतीमध्ये निवड झालेल्या बालकांच्या पालकांनी ‘आरटीई’ संबंधित संकेतस्थळावरुन प्रवेशपत्राची प्रिन्टआऊट काढावी. त्यानंतर कागदपत्रांच्या मूळ आणि झेरॉक्स प्रती घेऊन पडताळणी व प्रवेश केंद्रांवर उपस्थित रहावे. कागदपत्रांच्या पडताळणीनंतर विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित होतील. ज्यानंतर प्रवेशपत्र आणि पडताळणी केलेली कागदपत्रे घेऊन पालकांना निवडलेल्या शाळांमध्ये पाठविण्यात येईल. निवडलेली शाळा ही पालकांकडून कोणतीही अतिरिक्त कागदपत्रे मागणार नाहीत किंवा प्रवेश नाकारणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तरी सर्व संबंधितांनी याची नोंद घेऊन आवश्यक ती कार्यवाही वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण खात्यातर्फे करण्यात आले आहे.

मुंबईतील शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठीची ‘आरटीई’ विषयक आकडेवारी :-

  • एकूण शाळा : ३३७
  • एसएससी बोर्डाच्या शाळा : २७२
  • इतर बोर्ड शाळा : ६५
  • एकूण जागा : ६,५६९
  • प्री केजी : २२३
  • इयत्ता पहिली : ६,३४६
  • एकूण वैध ऑनलाइन अर्ज : १८,२०७
  • गेल्या वर्षी ऑनलाइन प्राप्त अर्जः १५,०५०
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.