शाळा सुरु करण्याच्या निर्णयाचा फेरविचार? मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

105

राज्य सरकारने १ डिसेंबरपासून पहिलीपासूनचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला होता, मात्र जगभरात थैमान घालत असलेल्या ओमिक्रोन या कोरोनाच्या व्हेरियंटमुळे आता राज्य सरकारने शाळा सुरु करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याचे ठरवले आहे. रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने टास्क फोर्सची बैठक ऑनलाईन घेतली. तेव्हा आरोग्यमंत्री राजेश टोपे उपस्थितीत होते. त्यावेळी सोमवारी, २९ नोव्हेंबर रोजी मंत्रिमंडळाची बैठक घेण्याचा निर्णय झाला. त्या बैठकीत शाळा सुरु करण्याच्या निर्णयावर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

लसीकरणावर भर देण्याचे निर्देश 

या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या नव्या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्राच्या सूचनांची प्रतीक्षा करू नका, राज्याने आपल्या स्तरावर तातडीने नियमावली बनवून ती अंमलात आणावी, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. तसेच विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी सक्तीची करा, मागील काही आठवड्यापासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांचा शोध घ्यावा आणि त्यांची चाचणी करावी, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. राज्यात लसीकरणावर भर देण्याचा आग्रह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धरला. तातडीने लसीकरणाचा वेग वाढवण्यात यावा, असेही ते म्हणाले. दरम्यान राज्यात ठिकठिकाणी जम्बो कोविड सेंटर सुरु करण्याबाबतही उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकी निर्णय होणार आहे. तसेच कोरोना संबंधी नियमावलीची कडक अंमलबजावणी करण्याचेही निर्देश दिले.

लॉकडाऊन नको असेल, तर…

तसेच, मागील दोन वर्षांत कोरोनामुळे लॉकडाऊन लावावा लागला होता. पण, आता लॉकडाऊन नको असेल, तर आरोग्याची बंधने पाळावीच लागतील, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. राज्य सरकारने आधीच केंद्र सरकारला दक्षिण आफ्रिकेसह इतर देशातून येणाऱ्या प्रवाशी विमानांची वाहतूक थांबावावी किंवा योग्य ती उपाय योजना करावी, अशी मागणी केली आहे. विमानतळांवर येणाऱ्या सर्व प्रवाशांकडे काटेकोर लक्ष देण्याचे देखील निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहे.

(हेही वाचा आंतरराष्ट्रीय प्रवासावर बंदी लावण्याची गरज! राजेश टोपेंचे मत)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.