महानगरपालिका निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार ऑनलाईन फॉर्म १६

मुंबई महानगरपालिकेतर्फे सालाबादप्रमाणे निवृत्ती वेतनधारक यांना आर्थिक वर्ष २०२१-२२ चे आयकर विषयक ‘प्रपत्र – १६’ ( फॉर्म सिक्स्टीन) ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. ही ऑनलाईन प्रपत्रे कोणत्याही इंटरनेट ब्राऊझरचा उपयोग करुन प्राप्त करता येऊ शकतील. इंटरनेट ब्राऊझर सुरु केल्यानंतर http://form16.mcgm.gov.in या संकेतस्थळावर लॉग इन करावे. आणि दिलेल्या चौकोनामध्ये कर्मचारी संकेतांक (सात आकडी) नमूद करावा. त्याखालील चौकोनामध्ये पॅन क्रमांक (PAN) अचूकपणे नोंदवावा. कर्मचारी संकेतांक आणि पॅन क्रमांकाची नोंद केल्यावर स्क्रीनवर दिसणारा ‘Captcha Code’ दिलेल्या चौकोनामध्ये अचूकपणे नोंदवावा आणि त्यानंतर Confirm या पर्यायावर ‘क्लिक’ करावे.

( हेही वाचा : युरोपात तापमान ४० डिग्रीपर्यंत पोहचणार! उष्णतेच्या लाटेने मृत्यूचे तांडव होणार? )

‘प्रपत्र – १६’ अर्थात ‘FORM 16’ दोन भागांमध्ये ‘भाग अ’ (PART A) आणि भाग ब (PART B) स्क्रीनवर दिसेल. ‘भाग अ’ (PART A) हा आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून वजा केलेल्या आयकराशी संबंधित आहे आणि ‘भाग ब’ (PART B) – आर्थिक वर्ष २०२१-२२ मधील उत्पन्न, गुंतवणूक व त्यावरील आयकर यांचा तपशिल आहे. त्यानंतर ‘डाऊनलोड’ (Download) या पर्यायावर क्लिक करावे.

‘भाग अ’ (PART A) मधील एकूण वजा केलेली आयकराची रक्कम, ‘भाग ब’ (PART B) मध्ये नमूद केलेल्या देय आयकराच्या रकमेतून वजा करुन योग्य ती आयकर देय किंवा परताव्याची रक्कम मिळवावी आणि वेळेत ‘इन्कम टॅक्स रिटर्न’ आयकर खात्याला सादर करावे.

महापालिकेचे आवाहन

आयकर विभागाच्या नियम क्रमांक २६ सी (26C) नुसार आर्थिक वर्ष २०२२-२३ करीता निवृत्ती वेतनधारकांनी केलेल्या आयकर बचतीच्या गुंतवणुकीची कागदपत्रे तसेच गृहकर्ज घेतलेले असल्यास वित्तीय संस्थेच्या पॅन क्रमांकासह सर्व माहिती प्रपत्र – १२ (12BB) मध्ये नमूद करुन निवृत्ती वेतन (आय.बी.) विभाग, ‘ई’ विभाग कार्यालय, भायखळा (पश्चिम), मुंबई येथे नियोजित वेळेत सादर करावे, असे आवाहन प्रमुख लेखापाल (कोषागार) यांनी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here