अब भी जिसका खून न खौला खून नहीं वो पानी है,अगर देश के काम ना आये तो बेकार जवानी है. विद्यार्थी परिषदेमध्ये असतांना आम्ही ह्या घोषणा द्यायचो, पण त्याचा खरा अर्थ वीर सावरकरांचे चरित्र वाचल्यानेच कळला. इंग्रजांच्या अत्याचाराने आणि चापेकरांच्या बलिदानाने किशोरावस्थेतील विनायकाचे जे रक्त खवळले त्याने नाशिकपासून ते लंडनपर्यंत रक्तरंजित खळबळ उडाली.
सावरकरांना अभिप्रेत तरुण-तरुणी कसे आहेत? तरुणपणी लिहिलेल्या ‘माझे मृत्युपत्र’ कवितेत ते म्हणतात,
‘बाजीप्रभु ठरू’ वदे युव संघ सर्व
‘आम्ही चित्तोड़ युवती’ युवती सगर्व
स्वधर्म, स्वराज्याच्या महान आदर्शासाठी ‘दीप्तानलात निज मातृ-विमोचनार्थ, हा स्वार्थ जाळुनि आम्ही ठरलो कृतार्थ’ म्हणणाऱ्या सावरकर कुटुंबीयांसमोर पावनखिंडीत धारातीर्थी पडणारे बाजीप्रभू देशपांडे आणि पावक ज्वालांमध्ये जीवंत जौहार करणाऱ्या पद्मावतीचे आदर्श होते.
(हेही वाचा कारगिल युद्धाच्या विजयगाथा सांगताना परमवीरचक्र सन्मानित योगेंद्र सिंह यादव यांनी सांगितले थरारक अनुभव)
जोसेफ मॅझिनीच्या ‘यंग इटली’चा जितका प्रभाव इटलीच्या स्वातंत्र्यलढ्यावर होता त्याहून अधिक प्रभाव सावरकरांचा, त्यांच्या अभिनव भारताचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यावर आहे. अनंत कान्हेरे, मदनलाल धिंग्रा, रासबिहारी बोस, वासुदेव बळवंत गोगटे, मानवेंद्र नाथ रॉय, कॉम्रेड डांगे, काँग्रेसचे यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब खेर ही मोजकी नावे त्या समग्र पिढीचे प्रतिनिधी आहे ज्यांनी तरुणपणी सावरकरांकडून प्रेरणा घेऊन स्वतः च्या कार्याचे ठसे उमटविले. एवढेच काय तर स्वातंत्र्यानंतरसुद्धा गोवा मुक्ति संग्रामात पोर्तुगिजांच्या कैदेत तारुण्य खर्ची करणारे निस्सीम सावरकर भक्त मोहन रानडे यांनी स्वतः च्या आठवणी सांगणाऱ्या पुस्तकाचे नावच ‘सतीचे वाण’ दिले आहे.
तरुणांकडून सावरकरांचीही तीच अपेक्षा होती. १९२४ मध्ये ते म्हणाले होते, ‘स्पार्टामध्ये याच्यापेक्षाही अधिक योग्यतेचे सुपुत्र आहेत’ असे आपल्या थडग्यावर लिहून ठेवण्यास सांगणाऱ्या स्पार्टातील एका वीराप्रमाणे मीही म्हणतो की आजच्या तरुणांनी केवळ माझे गुण गात न बसता माझ्यापेक्षा अधिक पराक्रम करून माझ्यापेक्षा अधिक मोठे व्हावे. तुमच्या अतुल पराक्रमामुळे माझे नाव मागे पडावे. स्वातंत्र्यानंतरच्या पिढीला संदेश देताना सावरकर म्हणाले, ‘तुम्ही स्वराज्य मिळताच ते उपभोगण्यासाठी मिळाले आहे असे समजू नका. हे तुमचे महाराज्य जर सुरक्षित आणि प्रबळ करावयाचे असेल तर आणखी दहा वर्षे तरी तुम्हांस स्वातंत्र्यसंपादक पिढीने केला त्याहून दस पटीने अधिक त्याग, अधिक कष्ट आणि अधिक पराक्रम केला पाहिजे.’
(हेही वाचा कोणालाही आता इतिहासतज्ज्ञ झाल्याचे वाटते; महापुरुषांच्या अवमानावरून राज ठाकरे यांचा टोला )
तरी शेवटी काही लोक म्हणतील की, सावरकरांच्या तेजाचा, त्यागाचा आजच्या तरुणाईला काय उपयोग? मिलेनियल जनरेशनला काळ्यापाण्याच्या कथेशी काय घेणे देणे? महाराष्ट्र टाइम्सचे सहसंपादक दि. वि. गोखले यांना कदाचित या प्रश्नांचे उत्तर सापडले होते, ‘‘एक वेळ गीता, ज्ञानेश्वरी नाही वाचली तरी चालेल, पण ‘माझी जन्मठेप’ वाचाच वाचा. कारण जो ‘जन्मठेप’ वाचेल तो युवक परीक्षेत नापास होणे, बेकार राहणे, प्रेयसीने झिडकारणे अशा क्षुल्लक कारणांसाठी आत्महत्या करणार नाही; कारण जीवनाचा खरा अर्थ सावरकरांच्या जन्मठेपेत विशद केलेला आहे.’’
लेखक – चिरायु पंडित, ‘वीर सावरकर : द मॅन हू कुड हेव प्रिव्हेंटेड पार्टिशन’ पुस्तकाचे सह-लेखक.