मुख्यमंत्री शिंदे यांच्या संकल्पनेतील रस्ते निविदांची पुन्हा वाढवली तारीख

234

मुंबईतील रस्त्यांवर वारंवार पडणाऱ्या खड्डयांच्या समस्येचे निवारण करण्यासाठी सरकारच्या निर्देशानुसार रस्त्यांचे सिमेंटीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. यासाठी मुंबईतील शहर, पूर्व उपनगरांसाठी दोन आणि पश्चिम उपनगरांसाठी तीन अशाप्रकारे ५८०६ कोटींच्या पाच निविदा रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणासाठी काढण्यात येत असल्याची घोषणा महापालिकेने १० ऑगस्ट  २०२२ रोजी केली. परंतु ५० दिवस उलटत आले तरी आजही प्रिबिडमध्ये या निविदा अडकल्या असून या निविदांना अधिक मुदतवाढ दिल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार तातडीने काढण्यात येणाऱ्या या निविदांमधील विलंब नक्की कुणाला त्यात ‘फिट’ करण्यासाठी होत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

उच्च न्यायालयात ३९७ किमी रस्त्याबाबत प्रक्रिया सुरु

मुंबईतील रस्त्यांवरील खड्डयांसंदर्भात उच्च न्यायालयात ३९७ किमी रस्त्याबाबत प्रक्रिया सुरु असून नोव्हेंबर महिन्यात कार्यादेश देण्याचे नियोजित असल्याचे सांगितले. तर उर्वरीत ३९८ किमी रस्त्यांबाबतही पुढील सहा महिन्यांमध्ये प्रक्रिया होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे पुढील तीन वर्षांच्या आत महापालिकेच्या अखत्यारितील सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण  होईल, अशीही ग्वाही त्यांनी न्यायालयात दिली. परंतु महापालिकेच्यावतीने ज्या ३९७ किमी रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणासाठी ५,८०६ कोटी रुपयांच्या पाच निविदा मागवण्याच्या प्रक्रियेला १० ऑगस्ट रोजी घोषणा झाली, त्या निविदा ५० दिवस उलटत आले तरी पूर्ण झाले नाही. आजही या निविदा प्रिबीडमध्ये अडकल्या असून मिळालेल्या माहितीनुसार या निविदेकरता तारीख वाढवून देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

(हेही वाचा भुजबळांना उपरती, आले थेट सरस्वती देवीच्या चरणी)

महापालिकाने ९०० कोटींच्या खर्चाच्या रस्ते विकासकामांचा समावेश केला

मुंबईमध्ये २३ जुलै २०२२ रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रस्ते सुधारणा कामांचा आढावा घेताना महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी यांनी मुंबईत यंदा ४०० किलोमीटर अंतराच्या रस्त्यांची सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यानंतर २ ऑगस्ट रोजी महापालिकेने यासाठी निविदा निमंत्रित केल्या, त्यामध्ये मुंबई शहर विभागासाठी सुमारे ७१ किलोमीटर अंतराच्या रस्ते कामांसाठी १ हजार १९४ कोटी रुपये अंदाजित खर्चाच्या एका निविदेचा समावेश आहे. त्याचप्रमाणे पूर्व उपनगरे विभागातील सुमारे ७० किलोमीटर अंतराच्या रस्ते कामांसाठी ८११ कोटी रुपये अंदाजित खर्चाची एक निविदा आहे. तर पश्चिम उपनगरांमधील तीनही परिमंडळांसाठी स्वतंत्र अशा एकूण तीन निविदा आहेत. यामध्ये एकूण २७५ किलोमीटर अंतराच्या रस्ते कामांसाठी ३ हजार ८०१ कोटी रुपये खर्चाचा अंदाज आहे. त्यानुसार, सुमारे ४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येणार असून त्यासाठी एकूण पाच निविदा निमंत्रित करण्यात आल्या आहेत. या पाच निविदांमध्ये समाविष्ट असलेल्या कामांसाठी एकूण अंदाजित ५ हजार ८०६ कोटी रुपये खर्च होणार आहे.  घोषणा केल्यानंतर महापालिका प्रशासनाने सुमारे ९०० कोटींच्या अंदाजित खर्चाच्या रस्ते विकासकामांचा समावेश केला. परंतु या निविदेलाच प्रतिसाद न मिळत असल्याने अखेर प्रशासनाला तारीख वाढवण्याची वेळ आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.