गोराईकडे जाणाऱ्या मार्गाचे रुंदीकरण केले जाणार असून या मार्गाला विळखा घातलेल्या झोपड्यांनाच हटवण्याची मोहिम महापालिकेने हाती घेतली आहे. या मार्गावर महात्मा फुले झोपडपट्टी वसली असून यातील पात्र झोपडपट्टीधारकांच्या पुनवर्सनाची प्रक्रिया मार्च अखेर पर्यंत पूर्ण करून या मार्गाचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. त्यातील आतापर्यंत ८८ पात्र कुटुंबांचे पुनर्वसन येथील प्रकल्प बाधितांच्या इमारतींमध्ये करण्यात आले आहे.
गोराई येथे जाणाऱ्या रस्त्यांची रुंदी ९० फूट असून यावर झोपड्यांचे अतिक्रमण झाल्याने हा रस्ता अरुंद आहे. या ठिकाणी महात्मा फुले झोपडपट्टी वसली असून त्याठिकाणी एकूण ३२६ झोपड्या आहेत. त्यातील सुमारे १७५ पात्र होण्याची शक्यता आहे. त्यातील आतापर्यंत ८८ पात्र कुटुंबांचे पुनर्वसन २६ जानेवारी रोजी लॉटरी काढून पंडित मल्हारराव कुलकर्णी मार्गावर असलेल्या प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनासाठी बांधलेल्या सदनिकांच्या इमारतीमध्ये करण्यात आला आहे.
(हेही वाचा गड-दुर्ग रक्षण महामोर्च्याचा IMPACT: तीन महिन्यांत स्वतंत्र ‘महाराष्ट्र गड-दुर्ग महामंडळा’ची होणार स्थापना)
गोराई भागात अनेक पर्यटक येत असल्याने या मार्गावरील वाहतूक कोंडी लक्षात या मार्गाचे रुंदीकरण करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. त्यामुळे परिमंडळ उपायुक्त भाग्यश्री कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली व आर मध्य विभागाच्या सहायक आयुक्त संध्या नांदेडकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत ही कारवाई केली जात आहे. त्यामुळे येथील झोपडीधारकांच्या पात्रतेचे काम येत्या काही दिवसांमध्ये पूर्ण करून मार्च अखेरपर्यंत येथील सर्व झोपड्यांचे अतिक्रमण तोडले जाईल,असा विश्वास महापालिकेच्या आर मध्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
या अतिक्रमणामुळे गोराई जेट्टीकडे जाणाऱ्या रुंदीकरणातील अडथळा दूर होईल आणि या रस्त्यांचे रुंदीकरण झाल्याने गोराईकडे जाण्यासाठीचा मार्ग मोकळा होऊन सुसाट वाहतुकीसाठी खुला होईल. विशेष म्हणजे या अतिक्रमणामुळे या झोपडपट्यांच्या मागील बाजुस असलेल्या नाल्याची साफसफाई करता येत नव्हती. परिणामी पावसाळ्यात या अरुण कुमार वैद्य मार्गावर पाणी तुंबण्याचे प्रकार घडायचे. त्यामुळे या रस्त्यांचे रुंदीकरण होईल व भविष्यात नाल्याची सफाईसह पर्जन्य जलवाहिनीचेही काम करण्यात येणार असल्याने या परिसरात पाणी तुंबण्याचे प्रकारही कमी होती,असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.