Cement Concrete Road : वांद्रे पश्चिम रंगशारदा परिसरातील रस्ते अडकले वादात?, निविदा प्रक्रियेवर संशय

165
Cement Concrete Road : वांद्रे पश्चिम रंगशारदा परिसरातील रस्ते अडकले वादात?, निविदा प्रक्रियेवर संशय

मुंबईतील रस्त्यांचे सिमेंटीकरण करून खड्डे मुक्त मुंबई करण्याचा प्रयत्न सुरु असतानाच आता वांद्रे पश्चिम येथील तब्बल १०० कोटी रुपयांचे रस्ते कंत्राट काम वादात अडकले आहे. काही ठराविक कंपनीलाच काम देण्यासाठी निविदा व अटी शर्ती बनवण्यात आल्या असून कंत्राटदाराशी संगनमत करून हे काम देण्यात आल्याने याची चौकशी केली जावी तसेच कंत्राट कामांमध्ये सहभागी अधिकाऱ्यांना त्वरीत निलंबित करण्यात यावे अशाप्रकारची मागणीच आता विधीमंडळात उबाठाचे आमदार सुनील प्रभू यांनी केली आहे. त्यामुळे वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा परिसरातील रस्ते कामाची निविदा रद्द केली जाते की निवडलेल्या कंत्राटदारांना काम बहाल केले जाते याकडे सर्वांचे लक्ष आहे. (Cement Concrete Road)

अंतिम आठवडा मांडताना सुनील प्रभू यांनी मुंबईतील रस्त्यांबाबतचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता. यावेळी त्यांनी बोलतांना, मुंबई महानगरपालिकेने २०२२ मध्ये मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातील रस्त्यांच्या कामासाठी पहिल्या टप्प्यात ६००० कोटींच्या निविदा मागवल्या असून त्यातील आजपर्यंत केवळ २५ टक्के कामे झालेली आहेत. तसेच शहर भागातील रस्ते कंत्राट कामांचा करार रद्द करण्यात आला. आता महापालिकेने पुन्हा शहर आणि उपनगरातील रस्त्यांच्या कामांसाठी दुसऱ्या टप्प्यात ६५०० कोटी रुपयांच्या निविदा मागवल्या असून या अंतिम टप्प्यात आल्याने यासाठीचे कार्यदिश जारी करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. (Cement Concrete Road)

एवढ्या मोठ्या निविदा मागवून त्या महापालिकेच्या अंदाजित दरातच अर्थात ऍटपार दरात बोलीदारांकडून काम करून घेतले जाते, ज्यामुळे महानगरपालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या एवढ्या मोठ्या पॅकेजच्या निविदा मागवण्यात आल्याने तसेच यापूर्वी उणे दराने बोली लावून काम मिळवणारे कंत्राटदार कंपन्या आता अंदाजित दरात रस्त्यांची कामे देण्यात आल्याने महापालिकेच्या तिजोरीवरच सुमारे २५०० ते ३००० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडल्याचे म्हटले आहे. (Cement Concrete Road)

(हेही वाचा – Vishalgad : विशाळगडावरील अतिक्रमणाला जातीय रंग देऊ नका; संभाजी राजे छत्रपती यांचे आवाहन)

सुनील प्रभू यांनी केली ‘ही’ मागणी 

मात्र, जास्त दर देऊनही मोठ्या कंत्राटदारांकडून योग्य प्रकारे कामे केली जात नसून त्यांनी केलेली बहुतांशी कामे ही निकृष्ट दर्जाची असल्याचे सुनील प्रभू यांनी म्हटले आहे. त्यात आता महापालिकेने डब्ल्यू ४३९ अंतर्गत वांद्रे पश्चिम भागातील रंगशारदा परिसरातील रस्त्यांच्या सुधारणांसाठी निविदा मागवल्या आहेत. तब्बल १०० कोटी रुपयांच्या या कंत्राट कामांसाठी महापालिकेने विशिष्ट अटी घातल्या आहेत, जेणेकरून काही दोन ते तीनच कंपन्या यात पात्र होतील. या निविदेसाठी आठ वेळा निविदांची तारीख वाढवतानाच आठव्या सुधारणेच्या पत्रकामध्ये पहिल्या पत्रकाच्या तुलनेत बदल करण्यात आला. ज्यामुळे यात अन्य कंपन्या सहभागी होणार नाही याची काळजी घेण्यात आल्याचे दिसून येत आहे. (Cement Concrete Road)

कंत्राटदाराच्या विशेष गटाला अनुकूल करण्यासाठी जारी केलेले सर्व निविदा अटींच्या सुधारणा पत्र तात्काळ रद्द करण्यात याव्यात आणि नव्याने अटी शर्तीसह तात्काळ निविदा निमंत्रित करण्यात याव्यात अशी मागणी प्रभू यांनी केली आहे. त्यामुळे कोणत्या महापालिकेच्या अधिकाऱ्याने संगनमत करून ठेकेदारासाठी व्युहरचना केली याची चौकशी करावी, अशी मागणी प्रभू यांनी केली आहे. महापालिकेच्या पैशांचा ऊहापोह करून केवळ एका ठेकेदाराला मदत करण्यात येत आहे. एखाद्या मित्राला जर शंभर कोटी रुपये देण्याचा घाट घालण्याचा प्रयत्न होत असेल. आणि महापालिकेचे अधिकारी हे काम करत असतील तर, हा मोठा भ्रष्टाचार आहे याची चौकशी व्हायला हवी. ज्यांनी ज्यांनी हा कट करून काम दिले, त्या सर्व अधिकाऱ्यांना निलंबित केले पाहिजे अशी मागणी प्रभू यांनी अंतिम आठवड्यातील भाषणादरम्यान केली. (Cement Concrete Road)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.