रस्त्यांच्या कामात गुणवत्ता सुधारणेचा प्रयत्न करतानाच आता प्रत्येक रस्त्यांच्या कामात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासन करत आहे. यासाठी सर्व रस्त्यांची प्रत्यक्ष कामे सुरू असताना, त्याविषयीची सविस्तर माहिती नागरिकांना कळावी, यासाठी बॅरिकेडवर क्यूआर कोड प्रकाशित केला जाणार आहे. हा क्यूआर कोड स्कॅन करून जनतेला संबंधित रस्ते कामाचा तपशील सहजपणे कळू शकणार आहे.
मुंबईतील सुमारे ४०० किलोमीटर अंतराच्या रस्त्यांची दर्जोन्नती आणि सुधारणा करण्यासाठी एकूण सुमारे ५ हजार ८०० कोटी रुपये अंदाजित खर्चाच्या ५ निविदा निमंत्रित केल्या आहेत. हे सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटने बांधले जाणार असून, त्यामुळे येत्या दोन वर्षात संपूर्ण मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त होतील, याचा महानगरपालिका प्रशासनाला विश्वास आहे. वेगवेगळ्या रस्ते कामांच्या निविदा एकत्रित स्वरूपात मागवल्याने राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील महामार्ग बांधणीचा अनुभव असलेल्या नामांकित व मोठ्या कंपन्या या निविदा प्रक्रियेत सहभागी होतील, अशी प्रशासनाला अपेक्षा आहे.