रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटर परिसरात फेरीवाल्यांना व्यावसाय करण्यास बंदी असतानाही अनेक रेल्वे स्थानकांना फेरीवाल्यांचा विळखा बसला गेला आहे. परंतु हा विळखा सोडवण्यात महापालिकेला अद्यापही यश आलेले नाही. यापूर्वीचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्या निर्देशानुसार रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई केली जात होती, परंतु माग जुलैपासून ही कारवाई थंडावलेंली असतानाच दादर पश्चिम रेल्वे स्थानक हे आता कायमस्वरुपी फेरीवालामुक्त करण्याचा पण महापालिकेने केला आहे. त्यामुळे दादर रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या प्रत्येक रस्त्यांवरील फेरीवाल्यांवर कारवाई करून प्रवाशांसह जनतेला हे रस्ते विनाअडथळा चालण्यास मोकळे करून दिले जात जात आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने दादरकर सुखावल्याचे पहायला मिळत आहे.
( हेही वाचा : महापालिका शाळांमधील मुलांना दप्तर खरेदीसाठी सुमारे ५१० ते ७६० रुपये मिळणार!)
फेरीवाल्यांवर धडक कारवाई
दादरमध्ये मोठ्याप्रमाणात फेरीवाले पदपथांसह रस्त्यांवर पथारी पसरवून बसले असून यामुळे रेल्वे प्रवाशांना या रस्त्यांवर अडचणींतून मार्ग काढत घर आणि रेल्वे स्थानक गाठावे लागते. या भागात मोठ्याप्रमाणात फेरीवाले असल्याने मुंबईकर मोठ्याप्रमाणात खरेदीसाठी दादरमध्ये गर्दी करत असतात. त्यामुळे मुंबईकरांचे एकप्रकारे दादर हे मध्यवर्ती खरेदी विक्रीचे ठिकाण ठरले आहे. त्यामुळे रस्ता अडवून बसणारे फेरीवाले आणि खरेदीला येणारे ग्राहक यामुळे या भागांत सकाळपासून संध्याकाळपर्यंत नागरिकांची मोठ्याप्रमाणात वर्दळ पहायला मिळते. त्यामुळे येथील फेरीवाल्यांसंदर्भात प्राप्त होणाऱ्या तक्रारींची दखल घेत महापालिकेच्या जी उत्तर विभागाच्या सहायक आयुक्तपदाचा भार स्वीकारल्यानंतर प्रशांत सपकाळे यांनी सर्व अधिकाऱ्यांना कामाला जुंपले.
महापालिका जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्तांच्या सूचनेनुसार, अतिक्रमण निर्मुलन विभागाचे वरिष्ठ निरिक्षक राजन कांबळे यांच्या नेतृत्वाखाली या फेरीवाल्यांवर मागील पंधरा दिवसांपासून कारवाई करून दादर परिसर पूर्णपणे फेरीवालामुक्त करण्यात येत आहे. दादर (पश्चिम) येथील गजबजलेले स्टेशन परिसर, जावळे रोड, डीसील्वा रोड, रानडे रोड व एन. सी. केळकर रोड आदींवरील फेरीवाल्यांवर धडक कारवाई करत हे रस्ते फेरीवाला मुक्त करण्यात आले.
वाहतूक कोंडीची समस्या दूर
जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पंधरा दिवसापासुन धडक कारवाई राबवण्यात येत असुन अनधिकृत फेरीवाल्यांविरुध्द राबवलेल्या या कडक कारवाईमुळे याचा फायदा दादर भागातील सकाळ व संध्याकाळ ये-जा करणाऱ्या सामान्य नागरिकांसह स्थानिक रहिवासी आदींना होत आहे. शिवाय या कारवाईमुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडीचीही समस्याही दूर झालेली पहायला मिळत आहे.
या कारावाईकरिता महापालिकेच्यावतीने स्थानिक शिवाजी पार्क पोलीस ठाणे यांच्यावतीने पुरेसा पोलीस बंदोबस्त पुरविण्यात आला. महापालिका व स्थानिक पोलीस यांच्या समन्वंयाने दादर परिसर हे पूर्णपणे फेरीवाला मुक्त करण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायायलाच्या आदेशाप्रमाणे रेल्वे स्टेशन पासुन १५० मी. पर्यंतचा परिसर फेरीवाला मुक्त ठेवण्यातकरिता जी-उतर विभाग व स्थानिक पोलीस एकत्रीतपणे काम करत आहे. यापूर्वी जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्तपदी असताना देवेंद्रकुमार जैन यांनी दादर रेल्वे स्थानक परिसर पूर्णपणे फेरीवालामुक्त करण्यात आला होता. त्यानंतर मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा दादर रेल्वे स्थानक परिसर फेरीवालामुक्त झालेला दिसून येत आहे.