- संतोष वाघ
देशावरील कोरोनाचे संकट जवळजवळ संपले, कोरोनाच्या काळात लावण्यात आलेले राज्यातील सर्व निर्बंधही उठवण्यात आलेले आहेत. मात्र तरीही पोलिसांकडून अटक करण्यात येणाऱ्या आरोपींची आरटीपीसीआर चाचणी केल्याशिवाय त्यांना मुंबईतील तुरुंगात प्रवेश नाकारला जात आहे. तुरुंग अधिकारी यांच्या या धोरणामुळे मुंबई पोलीस दलावर कामाचा ताण वाढला असल्यामुळे पोलीस अधिकारी आणि अंमलदारामध्ये नाराजी पसरली आहे.
कोरोनाच्या काळात तुरुंगात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्य शासनाने तुरुंगातील कैद्यांना कोरोनाची चाचणी अनिवार्य केली होती. तसेच बाहेरून येणारे कैदी किंवा आरोपीची आरटीपीसीआर चाचणी केल्यानंतर त्याचा अहवाल निगेटिव्ह आवरच त्या कैद्याला किंवा आरोपीला तुरुंगातील विलगीकरणात ठेवण्यात येत होते आणि पॉझिटिव्ह अहवाल आलेले कैदी किंवा बाहेरून येणारे आरोपी यांना आयसोलेशन सेंटरमध्ये ठेवण्यात येत होते. राज्यातील सर्व तुरुंगात हा नियम लावण्यात आलेला होता.
देशावरील कोरोनाचे संकट दूर झाले, तसे शासनाकडून लावण्यात आलेले सर्व निर्बंध उठवण्यात आले आहेत. मात्र तुरुंगात येणाऱ्या कैदी आणि आरोपींची आरटीपीसीआर चाचणी करण्याचा निर्णय अद्याप कायम आहे. मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक चव्हाण यांनी सांगितले की, मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात दररोज विविध गुन्ह्यांत आरोपींना अटक करण्यात येते. आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर काही दिवस तो आरोपी पोलीस कोठडीत असतो, त्यानंतर न्यायालय आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करते. न्यायालयीन कोठडीत रवानगी म्हणजेच त्या आरोपीला तुरुंगात पाठवण्याची जबाबदारी संबंधित पोलीस ठाण्याची असते, या आरोपीची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर वैद्यकीय अहवाल घेऊन आरोपीची रवानगी तुरुंगात करते वेळी तुरुंग अधिकारी यांच्याकडून आरोपीची आरटीपीसीआर चाचणीची मागणी केली जाते, अन्यथा त्या आरोपीला तुरुंगात ठेवून घेतले जात नाही, असे मुंबई पोलिस दलातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
(हेही वाचा Coal Scam : काँग्रेसचे माजी खासदार विजय दर्डा, देवेंद्र दर्डा यांना 4 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा)
आरोपीला न्यायालयात घेऊन जाणे, त्यांची वैद्यकीय चाचणी करणे, न्यायालयाच्या सूचनेनुसार त्याची रवानगी तुरुंगात करणे ही सर्व जबाबदारीची कामे पोलीस अंमलदार यांना करावे लागतात. आरटीपीसीआर चाचणी केल्यानंतर त्याचा अहवाल येण्यास विलंब लागत असल्यामुळे आरोपीला तुरुंगात पोहचविण्यापर्यंतची जबाबदारी संबंधित पोलीस ठाण्याची असते, अशी माहिती एका पोलीस अंमलदाराने दिली.
कोरोनाचे सर्व निर्बंध काढण्यात आल्यानंतर आम्ही आरटीपीसीआर चाचणीशिवाय आरोपींना तुरुंगात दाखल करून घेत असल्याचे तुरुंग उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना सांगितले, तर आर्थर रोड तुरुंगाचे तुरुंग अधीक्षक अहिरराव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, माझी नुकताच ठाणे मध्यवर्ती तुरुंग येथून आर्थर रोड तुरुंगात अधीक्षक म्हणून बदली झाली आहे, मी ठाण्यात असताना आरटीपीसीआर शिवाय आरोपीना तुरुंगात दाखल करून घेत होतो, आर्थर रोड तुरुंगात बाहेरील न्यायबंदी कैदी आणि इतर तुरुंगातून आलेल्या कैद्यांना आरटीपीसीआर आवश्यक नाही, जर तसे होत असेल तर मी इतर अधिकारी यांच्याशी चर्चा करेल, असे अहिरराव यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community