गेल्या पाच महिन्यांपासून एसटी कर्मचा-यांचे आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर हे आंदोलन अधिक चिघळल्याचे पहायला मिळाले. शरद पवार यांच्या विरोधात प्रक्षोभक विधाने केल्यामुळे हा हल्ला झाल्याचा आरोप करत, गुणरत्न सदावर्तेंना अटक करण्यात आली.
पण काही लोकांनी एसटी कर्मचा-यांना फूस लावून दिशाभूल झाल्याची माहिती आता मिळत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक उलट-सुलट अफवा पसरवण्यात आल्यामुळेच एसटी कर्मचा-यांचे आंदोलन दीर्घकाळ चालल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
(हेही वाचाः सदावर्तेंना १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी)
एसटी कर्मचा-यांची दिशाभूल?
मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवार 7 एप्रिल रोजी एसटी कर्मचा-यांना 22 एप्रिल पर्यंत कामावर रुजू होण्यासाठी अल्टिमेटम दिले. त्याच दिवशी संध्याकाळी एसटी कर्मचा-यांनी आझाद मैदानावर जल्लोष केला. पण शनिवारी कर्मचारी आंदोलक हे थेट शरद पवार यांच्या घरावर धडकले. पवारांच्या घरावरील आंदोलनाची सर्व स्तरांतून निंदा करण्यात आली. पण व्हॉट्सअप, फेसबूकवर पसरलेल्या काही अफवांमुळे एसटी कर्मचा-यांची दिशाभूल होऊन हे आंदोलन अधिक चिघळल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
(हेही वाचाः ‘सिल्व्हर ओक’ वरील हल्ल्याची विश्वास नांगरे पाटलांना होती पूर्वकल्पना!)
‘या’ अफवांचा पूर
एसटी कर्मचा-यांनी संपातून माघार घेऊ नये म्हणून काही अफवा या जाणीवपूर्वक पसरवण्यात आल्या. त्यामुळेच एसटी कर्मचा-यांचं हे आंदोलन दीर्घकाळ सुरू असल्याचे बोलले जात आहे.
- जे आंदोलक संपात सहभागी राहतील, त्यांचंच विलीनीकरण होणार, इतर कर्मचारी विलीनीकरणापासून वंचित राहणार.
- जे आझाद मैदानात संप करत आहेत, त्यांच्यावरील कारवाया मागे घेतल्या जातील.
- सरकारनं दिलेली पगारवाढ कामावर रुजू झाल्यावर मागे घेतली जाणार.
- आंदोलन मागे घेत जर कर्मचारी कामावर रुजू झाले तर एसटी महामंडळ कारवाई करणार.
- 45 दिवसांवर संप गेला तर तो अधिकृत होतो, त्यानंतर मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागतो.
(हेही वाचाः पवारांच्या बंगल्यावरील हल्ला भोवला, १०९ एसटी कामगारांनी नोकरी गमावली)
कारवाई कधी होणार?
सोशल मीडियावर अशा अफवांचं पेव फुटल्यामुळेच हे आंदोलन चिघळलं का, असा प्रश्न आता निर्माण होत आहे. प्रशासनाकडून देखील याची योग्य ती दखल घेतली न गेल्यामुळे संभ्रमावस्थेत सापडलेले एसटी कर्मचारी संपात भरडले गेल्याची शक्यता असून, अशा अफवा पसरवणा-यांवर कारवाई कधी होणार, असा सवाल देखील आता उपस्थित होत आहे.
Join Our WhatsApp Community