-
ऋजुता लुकतुके
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण या आठवड्यातही सुरूच राहिली. शुक्रवारी रुपयाने चक्क डॉलरमागे ८५.०५ रुपयांचा निच्चांकी स्तर गाठला. गेल्याच आठवड्यात रॉयटर्स वृत्तसंस्थेनं तसा अंदाज वर्तवला होता. पण, ८५ रुपयांचा स्तर गाठण्यासाठी रुपया आणखी ६ महिने घेईल असा अंदाज असताना अमेरिकन फेडरल बँकेची बातमी आली. आणि डॉलर, रुपयांमधील दरी आणखी वाढली. शुक्रवारी अमेरिकन फेडरल बँकेनं पुढील वर्षभरात अमेरिकेत फारशी व्याजदर कपात होणार नाही, अशी दिशा स्पष्ट केली. त्यामुळे जगभरातील चलनात घसरण दिसून आली. भारतीय रुपयाही या घसरणीतून सुटला नाही. (Rupee vs Dollar)
त्यामुळे रुपयाने हा निच्चांकी दर गाठला आहे. अलीकडे ६ डिसेंबरला झालेल्या पतधोरणाच्या बैठकीत रिझर्व्ह बँकेनं सावध पवित्रा घेत व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला. भारतातील आणि जगभरातील महागाई हे त्यामागील कारण आहे. त्यामुळे रुपयालाही त्याचा फटका बसत आहे. शिवाय अमेरिकेतील ट्रंप प्रशासनाचे काही कडक निर्णय त्याला कारणीभूत आहेत. अलीकडेच ट्रंप यांनी भारताला, ‘करांना उत्तर कराने देणार,’ असा इशारा दिला आहे. (Rupee vs Dollar)
(हेही वाचा- भारत जोडो यात्रेत अर्बन नक्षल कनेक्शन; विधानसभेत Devendra Fadnavis काय म्हणाले?)
म्हणजेच भारताने अमेरिकेतून आयात होणाऱ्या वस्तूंवर आयात शुल्क कमी केलं नाही, तर अमरेकाही भारतातून अमेरिकेत जाणारा कृषि माल तसंच ॲल्युमिनिअम, पोलाद या वस्तूंवर चढं आयात शुल्क लावणार आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार आणखी महाग होऊ शकतो. आंतरराष्ट्रीय व्यापारावरच चलनाचं मूल्य अवलंबून असतं. त्यामुळे रुपयाची घसरण तूर्तास थांबण्याची लक्षणं नाहीत. (Rupee vs Dollar)
यावर्षी ऑक्टोबर महिन्यापासून रिझर्व्ह बँकेनं रुपया सावरण्यासाठी देशातील परकीय गंगाजळीतील तब्बल ५० अब्ज अमेरिकन डॉलर खर्च केले आहेत. असं असतानाही रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत सध्या ८४ रुपये ७४ पैशांवर आहे. अमेरिकेचं आयात कर वाढवण्याचं धोरण तसंच राहिलं तर भारतातील महागाई दर आणखी वाढणार आहे. त्याचा परिणामही रुपयावर होणार आहे. (Rupee vs Dollar)
(हेही वाचा- Lionel Messi : लायनेल मेस्सी मँचेस्टर युनायटेडकडून प्रिमिअर लीग खेळणार?)
ज्या कालावधीत भारताने ५० अब्ज अमेरिकन डॉलर खर्च केले, त्याच कालावधीत भारताबाहेरून भारतात फक्त १३ अब्ज अमेरिकन डॉलरची भर पडली. देशातील उत्पादन क्षेत्राला लागलेली ओहोटी आणि बाहेरून भारतीय शेतमाल आणि इतर मालाची कमी झालेली मागणी यामुळे रुपयावर असा प्रतिकूल परिणाम होताना दिसत आहे. (Rupee vs Dollar)
एखाद्या चलनाचा दर ठरवताना दोन चलनांमध्ये किती आंतरराष्ट्रीय व्यापार झाला ते गृहित धरलं जातं. म्हणजे भारतातून अमेरिकेला होणारी निर्यात आयातीपेक्षा जास्त असेल तर भारतीय रुपया मजबूत होईल. उलट भारताकडून आयात जास्त आणि निर्यात कमी असेल तर रुपया त्या चलनाच्या विरोधात घसरेल. (Rupee vs Dollar)
(हेही वाचा- Supreme Court ची महत्त्वाची टिप्पणी- पोटगीच्या नावावर संपत्तीचे समान वाटप चुकीचे, तर कायदा…)
सर्वसाधारणपणे रुपयाच्या घसरणीचे तोटेच जास्त असले तरी भारतातील जे उद्योग अमेरिकेला विविध सेवा पुरवतात, त्यांना याचा फायदाही होतो. म्हणजेच भारतातील टेक उद्योग हा सर्वाधिक महसूल कमावणारा उद्योग आहे. त्यांचा बहुतांश व्यापार अमेरिकेबरोबर आणि अमेरिकन डॉलरमध्ये चालत असल्यामुळे रुपया घसरल्यावर त्यांचा फायदा वाढतो. शिवाय भारतीय फार्मा कंपन्याही अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर निर्यात करतात. निर्यात उद्योगात असलेल्या सर्वांचाचा त्यामुळे फायदा होतो. (Rupee vs Dollar)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community