‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत किती महाराष्ट्रीयन युक्रेनमधून परतले?

104

रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा ही मोहीम सुरू केली आहे. या मोहीमेतंर्गत मंगळवारी सकाळी मुंबई विमानतळावर युक्रेनहून आणखी एक विमान आले. या विमानात १८२ विद्यार्थी आहेत. सध्या युक्रेनमध्ये युध्द सुरु असून तेथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याची भारत सरकारची ‘ऑपरेशन गंगा’ मोहीम सुरु आहे. या मोहिमेंतर्गत रविवार मध्यरात्री पासून सोमवारी सायंकाळपर्यंत एकूण पाच विमानांद्वारे जवळपास १२५० भारतीय विद्यार्थी दिल्लीत दाखल झाले असून यात महाराष्ट्रातील ७२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

काय आहे अॉपरेशन गंगाचा तपशील

एयर इंडियाच्या विशेष विमानाने बुखारेस्ट (रोमानिया) येथून रविवारी मध्यरात्री दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिले विशेष विमान दाखल झाले. यात, महाराष्ट्रातील २८ विद्यार्थ्यांचा समावेश होता. यानंतर, रविवारी सकाळी आणि सायंकाळी अशा दोन विशेष विमानांनी महाराष्ट्रातील प्रत्येकी १८ आणि १२ विद्यार्थी दाखल झाले. सोमवारी सकाळी आणि सायंकाळी अशा दोन विशेष विमानांनी प्रत्येकी १० आणि ४ विद्यार्थी दिल्लीत दाखल झाले आहेत.

महाराष्ट्र सदनाद्वारे ४६ विद्यार्थी स्वगृही सुखरूप परत

युक्रेनमधून दिल्लीत परतणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सुखरुप स्वगृही पोहचता यावे,यासाठी महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव समीरकुमार बिस्वास यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्र सदनाचा सहकार्य कक्ष सुरु करण्यात आला आहे. सदनाच्या अपर निवासी आयुक्त डॉ. निरुपमा डांगे या कक्षाच्या पर्यवेक्षणाची आणि केंद्र शासनासोबत समन्वयाची जबाबदारी पार पाडत आहेत. या कक्षाद्वारे गेल्या दोन दिवसात ४६ विद्यार्थ्यांना सुखरूप स्वगृही पाठविण्यात आले आहे.

(हेही वाचा क्रीडा क्षेत्रातही रशियावर प्रतिबंध! कोणत्या स्पर्धांमधून केले हद्दपार?)

सहकार्य कक्षामध्ये एकूण २५ अधिकारी-कर्मचारी अहोरात्र कार्यरत

महाराष्ट्र सदनाद्वारे दिल्ली विमानतळावर स्थापन सहकार्य कक्षात ५ अधिकारी- कर्मचारी तर ५ वाहन चालक कार्यरत आहेत. विमानतळाहून महाराष्ट्र सदनामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक सर्व सहकार्य करण्यासाठी तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १२ कर्मचारी कार्यरत आहेत.

सहकार्य कक्षाद्वारे असे सुरु आहे कार्य

दिल्लीत दाखल होणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार विमानाद्वारे राज्यातील त्यांच्या घरापासून नजीकच्या गंतव्यस्थळी पोहचविण्यासाठी या कक्षाद्वारे विमानाचे तिकीट काढून देण्यात येत आहे.विमानतळाहून कक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सदनात ने-आण करण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांची निवासाची व भोजनाची व्यवस्था महाराष्ट्र सदनात करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना उपलब्धतेनुसार विमानाद्वारे सुखरुप स्वगृही पोहचविण्यात येत असून आतापर्यंत ४६ विद्यार्थी सुखरूप स्वगृही परतले आहेत. युक्रेनमधून दिल्लीत परतणाऱ्या भारतातील विविध राज्यातील विद्यार्थ्यांना आप-आपल्या राज्यात सुखरुप पोहचता यावे यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिल्लीस्थित विविध राज्यांच्या निवासी आयुक्त कार्यालयांना मदत कक्ष स्थापन करण्याच्या सूचना केल्या आहेत. यानुसार इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्रासह अन्य राज्यांचे मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.