विनोदी अभिनेता आणि हास्यकलाकार सागर कारंडे (Sagar Karande) यांची ६१ लाखांची फसवणूक झाली आहे. सायबर क्राईम करत भामट्यांनी सागर कारंडेना ६१ लाखांचा गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी ३ अज्ञातांविरोधात मुंबई सायबर पोलिसांकडून (Mumbai Cyber Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इन्स्टाग्रामवर लाईकच्या बदल्यात १५० रुपयांचं आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली आहे. विश्वास मिळवण्यासाठी सुरुवातील सायबर क्राईम (Cyber Crime ) करणाऱ्या भामट्यांनी कारंडे (Sagar Karande) यांच्या खात्यात २२ हजार रुपये देखील पाठवले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पैसे उकळून अभिनेत्याची फसवणूक करण्यात आली.
( हेही वाचा : Haridwar मधील कत्तलखाने करणार बंद; दारू विक्रीवरही प्रतिबंध)
कशी झाली सागर कारंडेची फसवणूक?
फेब्रुवारीमध्ये सागर कारंडेला (Sagar Karande) अनोळखी क्रमांकावरून एका महिलेने संपर्क साधला. टेलिग्राम आणि अन्य समाजमाध्यमांवर पाठवण्यात येणाऱ्या इन्स्टाग्राम लिंकला लाइक करण्याचे आवाहन केले. प्रत्येक लाइकला दीडशे रुपये दिले जातील, अशा प्रकारे घरबसल्या सहा हजार रुपये कमावता येतील, अशी योजना मांडली. त्यास होकार देत सागरने (Sagar Karande) काम सुरू केल्याचे एफआयआरमध्ये नमूद केले आहे. सुरुवातीला दहा वेळेस ११ हजार रुपये मिळाल्याने सागरचा या योजनेवर विश्वास बसला. पुढे मात्र हे काम सुरू ठेवण्यासाठी पैसे गुंतवावे लागतील. त्याचे अतिरिक्त ३० टक्के कमिशन आणि लाइक केल्याचा वेगळा मोबदला वॉलेटवर जमा होईल, असे सांगण्यात आले.
सागरने सुरुवातीला काही रक्कम भरली. कमिशन व मोबदला भामट्यांनी उघडलेल्या वॉलेटवर जमा झाले. तसेच सुमारे २७ लाख रुपये गुंतवून काम स्विकारले. वॉलेटमधील पैसे काढण्याचा प्रयत्न केला, मात्र टास्क पूर्ण झाल्यावर ते मिळतील असे सांगितले. सागरकडून (Sagar Karande) आणखी १९ लाख रुपये व त्यावर ३० टक्के कर, असे एकूण ६१.८३ लाख रुपये भरले. मात्र ३० टक्के कर चुकीच्या खात्यात गेल्याचे सांगत पुन्हा पैसे भरण्यास सांगितल्याने सागरच्या मनात शंका आली. त्यानंतर त्याने तक्रार दिली. पोलीस सध्या आता याप्रकरणाचा तपास करत आहेत.
सागर कारंडे (Sagar Karande) यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या विनोदी कार्यक्रमातून आणि विविध नाटकांमधून अभिनेता सागर कारंडेनं प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. सोशल मीडिया इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सागर कारंडे कायम चाहत्यांशी संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community