सुरक्षा रक्षकाने केलेल्या तक्रारीवरून साकीनाका बलात्कार प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे उत्तरप्रदेशच्या जौनपूरयेथील मोहन चौहानला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला २१ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. या प्रकरणाचा तपास १ महिन्यात पूर्ण करण्यात येईल, तसेच त्यानंतर हा खटलाही जलद न्यायालयात चालवण्यात येईल, असे मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे म्हणाले.
साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणे हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. यासंदर्भात मी राज्याच्या गृहमंत्र्यांशी देखील बोललो आहे, हे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारास कठोरात कठोर शासन केले जाईल. यासंदर्भातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल.
– उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री.
आरोपी एकच!
उपचारा दरम्यान पीडित महिलेचा मृत्यू झाल्याने हत्येचे कलमही वाढवले आहे. या गुन्ह्यात एकच आरोपी असून दुसरा आरोपी नाही, म्हणून गुन्ह्यातील ३४ कलम काढलेले आहे. पीडित महिला बेशुद्ध असल्याने तिचा जबाब घेता आला नाही. ती बेशुद्ध अवस्थेतच होती. त्यामुळे नक्की काय घडले आहे. याबद्दल आम्ही अनभिज्ञ आहोत. पण तपासातून याबाबत लवकरच अधिक माहिती प्राप्त होईल. हा तपास लवकरात लवकर पूर्ण होईल आणि आरोपपत्र दाखल केले जाईल, असेही पोलिस आयुक्त हेमंत नगराळे म्हणाले.