समृद्धी महामार्गावर किती टोल भरावा लागणार? असे असतील दर…

97

समृद्धी महामार्गाचे ११ डिसेंबर रोजी उद्घाटन होणार आहे. नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. समृद्धी महामार्गावर प्रवास करताना नेमका किती टोल भरावा लागणार आहे याची उत्सुकता आता सर्वांनाच आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. मुंबई ते नागपूर या ७०१ किलोमीटरच्या मार्गावर प्रवाशांना अनेक सोयीसुविधा मिळणार आहेत. हा मार्ग सुरू झाल्यानंतर नागरिकांना ७०१ किलोमीटरचे अंतर वेगाने पूर्ण करता येईल. या वाहनांना नेमका किती टोल भरावा लागणार याबाबत अधिकृत आकडेवारी समोर आली आहे.

( हेही वाचा : मिशन वर्ल्डकप २०२३ : पुढील वर्षात टीम इंडिया खेळणार २८ सामने, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक)

नागपूरपासून शिर्डीपर्यंतचा समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा सध्या सुरू होत आहे. या पहिल्या टप्प्यात १९ टोलबूथ आहेत. छोट्या चार चाकी वाहनांसाठी प्रति किमी १ रुपये ७३ पैसे टोल निश्चित करण्यात आला आहे. म्हणजेच एकंदर नागपूर ते शिर्डीपर्यंत ९०० रुपये टोल भरावा लागणार आहे. मुंबई पर्यंतच्या ७०१ किमीच्या प्रवासासाठी साधारण १२०० रुपयांचा टोल द्यावा लागणार आहे. समृद्धी महामार्गावर नागपूरपासून मुंबईपर्यंत एकूण २६ टोल बूथ असणार आहे.

असे असतील दर

समृद्धी महामार्गावर टोलच्या माहिती देणारा फलक लावण्यात आला आहे. या बोर्डवर सर्व प्रकारांच्या वाहनांसाठी किती टोल लागेल याची माहिती दिली आहे. मोटर, जीप, व्हॅन हलक्या मोटर वाहनांसाठी १.७३ रुपये प्रतिकिलोमीटर इतका टोल असणार आहे. तर हलकी व्यावसायिक वाहने, मालवाहतुकीची वाहने अथवा मिनी बससाठी २.७९ रुपये प्रतिकिमी दर इतका टोल असणार आहे. बस, ट्रकसाठी ५.८५ रुपये प्रतिकिलोमीटर इतका टोल असणार आहे. तसेच अतिअवजड वाहनांसाठी ११.१७ रुपये प्रतिकिलोमीटर इतका टोल असणार आहे. समृद्धी महामार्गावर हे टोलचे दर ३१ मार्च २०२५ पर्यंत म्हणजेच पुढील ३ वर्षांसाठी लागू राहतील.

सध्या मुंबई ते नागपूर हे अंतर कापण्यासाठी जवळपास १४ तास लागतात परंतु समृद्धी महामार्ग पूर्ण झाल्यावर हे अंतर ८ तासात कापणे शक्य होणार आहे.

या जिल्ह्यांमधून जाणार समृद्धी महामार्ग

या १२ जिल्ह्यांमधून समृद्धी महामार्ग जाणार आहे. यामध्ये नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे या जिल्ह्यांचा समावेश आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.