मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाशी नांदेड शहराला जोडण्यासाठी जालनापासून नांदेडपर्यंत द्रुतगती महामार्ग उभारण्याच्या प्रस्तावावर शासन निर्णयाचीही मोहर लागली असून, यामुळे या प्रकल्पाच्या उभारणीला आता अधिक गती प्राप्त होणार आहे.
प्रस्तावाला मान्यता
मुंबई व नागपूरला जोडणारा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग मराठवाड्यातील औरंगाबाद व जालना या दोन जिल्ह्यांतून जात आहे. या महामार्गाशी मराठवाड्यातील नांदेड, परभणी व हिंगोली हे जिल्हे देखील जोडले जावेत, या हेतूने सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी जालना ते नांदेड द्रुतगती महामार्गाची संकल्पना मांडली होती. मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने २५ ऑगस्ट रोजी याबाबतच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली व सोमवारी रात्री या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला.
(हेही वाचाः राज्य कोरोनाने त्रस्त, पण एमएमआरडीएचा पीआर मस्त)
वाहतुकीला मोठा फायदा
सार्वजनिक बांधकाम विभागाने काढलेल्या या शासन निर्णयानुसार सदर प्रकल्पासाठी ड्रोन व लिडार सर्वेक्षण करणे, तांत्रिक-अभियांत्रिकी व वित्तीय सुसाध्यतेसह सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी तांत्रिक सल्लागाराची नियुक्ती करणे, प्रकल्पाची आखणी अंतिम करुन भूसंपादन व त्यासाठी अंदाजपत्रकीय तरतूद करुन निधी उपलब्ध करुन देणे आदी बाबींसाठी मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत या महामार्गाची उभारणी होणार असून, हा प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर नांदेडसह परभणी व हिंगोलीपासून मुंबई तसेच औरंगाबाद पर्यंतच्या प्रवासाच्या कालावधीत मोठी घट होणार आहे. त्याचप्रमाणे बीड व जालना जिल्ह्यांतील वाहतुकीलाही त्याचा लाभ मिळेल.
कमी वेळात कापता येणार अंतर
सध्याच्या महामार्गाने जालना ते नांदेड हे अंतर सुमारे २२६ किलोमीटर असून, हे अंतर कापायला साधारणतः ५ तासांचा अवधी लागतो. मात्र, नवीन महामार्गाने नांदेड पासून जालन्यापर्यंतचे अंतर केवळ दोन ते सव्वा दोन तासांत पूर्ण करता येईल. या प्रकल्पांतर्गत नांदेड शहरातील हिंगोली गेट-बाफना चौक-देगलूर नाका ते छत्रपती चौक, धनेगाव जंक्शन रस्त्याची सुधारणा, उड्डाणपूल आणि गोदावरी नदीवरील पुलाचेही बांधकाम होणार आहे.
(हेही वाचाः फडणवीसांच्या ‘त्या’ बैठकीनंतर मविआ मंत्री टार्गेटवर… मलिकांचा आरोप)
Join Our WhatsApp Community