संयुक्त महाराष्ट्र कलादालनाला ११ वर्षे पूर्ण, तरीही एमटीडीसीच्या यादीत स्थान नाही!

३० एप्रिल २०१०मध्ये संयुक्त महाराष्ट्र कलादालनाचे उद्घाटन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याहस्ते करण्यात आले. शिवसेनाप्रमुख यांच्या संकल्पनेतूनच हे कलादालन उभारण्यात आले.

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, असा नारा देत पुकारलेल्या संयुक्त महाराष्ट्र लढ्यामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली. या लढ्याच्या स्मृती पुढील पिढीच्या स्मरणात चिरंतन राहण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पार्क अर्थात शिवाजी पार्क येथे उभारलेल्या संयुक्त महाराष्ट्र कलादालनाला ३० एप्रिल रोजी ११ वर्षे पूर्ण झाली. मागील पाच वर्षे शिवसेनेने भाजप सोबत राज्यात युतीचे सरकार उपभोगले, तर सध्या दीड वर्षे महायुतीचे सरकार ते चालवत आहे. विशेषत: राज्याच्या मुख्यंमत्रीपदी खुद्द उध्दव ठाकरे असून पर्यटनमंत्रीही आदित्य ठाकरे आहेत. परंतु या संयुक्त महाराष्ट्र दालनाचा समावेश अद्यापही महाराष्ट्र पर्यटन विकास कॉर्पोरेशनच्या (एमटीडीसी)च्या यादीमध्ये करण्यात आला नाही. अजोय मेहता आयुक्त असताना त्यांनी एमटीडीसीला पत्र लिहिले होते. पण राज्यात सरकार येवूनही संयुक्त महाराष्ट्र कलादालनाचा समावेश एमटीडीसीच्या यादीमध्ये करण्याकडे शिवसेनेचा दुर्लक्ष होतच आहे.

शिवसेनाप्रमुखांच्या संकल्पनेतूनच उभारण्यात आले कलादालन! 

छत्रपती शिवाजी महाराज पार्क अर्थात शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाशेजारी संयुक्त महाराष्ट्र कलादालनाची निर्मिती सन २००९-१०मध्ये हाती घेवून ३० एप्रिल २०१०मध्ये याचे उद्घाटन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याहस्ते करण्यात आले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतूनच हे कलादालन उभारण्यात आले. यासाठी स्वतंत्र निविदा न काढता प्रशासनाने येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय जलतरण तलावाच्या बांधकामांच्या कंत्राट कामांमध्ये याचा समावेश करत बी.जी. शिर्के यांच्याकडून हे काम करून घेतले होते. त्यामुळे ज्या शिवसेनेने नियमबाह्य काम देत या कलादालनाची उभारणी केली, त्याच कलादालनाकडे ना शिवसेनेचा लक्ष आहे ना महापालिकेचा आणि नाही राज्य सरकारचा.

(हेही वाचा : सीमाभागाचा आणि कोरोनाविरुद्धचा लढा जिंकणारच! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विश्वास)

कलादालनाबाबत राज्यातील जनतेला माहिती नाही!

मागील दहा वर्षातील जर आढावा घेतला, तर मागील दीड वर्षांपासून कोविडमुळे याठिकाणी कुणी येत नाही. परंतु त्यापूर्वीही दिवसाला ६० ते ७० लोकांवर या कलादालनाला भेट देणाऱ्याांची संख्या होती. केवळ रविवारी सुट्टीच्या दिवशीच काही प्रमाणात भेट देणाऱ्यांची संख्या वाढते. पण त्याव्यतिरिक्त या कलादालनाकडे कुठल्याही बाहेरील पर्यटकांचे पाय फिरकत नाही. मुंबईतील जनतेलाही या कलादालनाची माहिती नसून याठिकाणी येणाऱ्या नागरीकांनाही कलादालनात प्रवेश दिला जात नसल्याने अनेकांना या कलादालनाची माहिती अद्यापही मिळू शकलेली नाही.

कलादालनाचे वैशिष्टय!

या कलादालनाची वास्तू एक मजल्याची आहे. तळ मजल्यावर संयुक्त महाराष्ट्र चळवळी संबंधी छायाचित्रे, शिल्पाचे तसेच माहितीचे फलक आहेत. याशिवाय याच तळमजल्यावर चळवळीत सहभागी झालेल्या नेत्यांची तैलचित्रे, महाराष्ट्रातील नद्यांचे पाणी व माती असलेले कलश आहे. याबरोबरच भारत मातेची शिल्पाकृती, महाराष्ट्रातील लोककलेची शिल्पाकृती आदींची मांडणी करण्यात आली आहे. तर पहिल्या मजल्यावर गडकिल्ल्यांचे, लेण्यांचे, देवस्थांनाची व पर्यटनस्थळांचे विहंगम दृश्य तसेच लोककला व संस्कृती व प्राचीन शिल्पे दर्शवण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here