मुंबईतील सार्वजनिक शौचालयांमध्ये पाच हजार सॅनिटरी नॅपकीन वेंडीग आणि इन्सिनेटर मशीन्स

मुंबईतील सार्वजनिक शौचालयांमध्ये कॉम्बो सॅनिटरी नॅपकीन वेंडींग आणि इन्सिनेटर मशीन बसवण्यात येणार असून तब्बल पाच हजार अशाप्रकारच्या मशीन्सची खरेदी केली जाणार आहे. या मशीनचा पुरवठा आणि पुढील दोन वर्षांच्या देखभालीसाठी आता कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. याच्या खरेदीसाठी तब्बल ४५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

मुंबईमध्ये उपनगरांमधून येणाऱ्या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात असून महिलांच्या मासिक पाळीमध्ये सॅनिटरी नॅपकीनची आरोग्याच्या दृष्टीकोनातून आवश्यकता असते. महिलांमध्ये आरोग्याबाबतची सजगता वाढल्याने सॅनिटरी नॅपकीन्सच्या वापरांमध्ये वाढ झालेली आहे. अशा वापर केलेल्या सॅनिटरी नॅपकिन्सची विल्हेवाट शास्त्रोक्त पध्दतीने लावण्याच्या दृष्टीकोनातून सार्वजनिक शौचालयांमध्ये आयओटी आणि डेटा ऍनालिटीक्स आधारी कॉम्बो सॅनेटरी वेंडींग आणि इन्सिनेटर मशीन्स बसण्याचा निर्णय घेतला आहे.

या मशीन्सच्या खरेदीसाठी मागवलेल्या निविदेमध्ये रियलझेस्ट व्हेंडकॉन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पात्र ठरली असून पाच हजार मशीन्सच्या खरेदीसाठी ४३ कोटी ८७ लाख ३५ हजार रुपयांचा खर्च येणार आहे. या एका मशीन्ससाठी ७६ हजार ५२८ रुपये एवढा खर्च येणार असून एक वर्षांच्या हमी कालावधीनंतर पुढील दोन वर्षांकरता सुमारे आठ हजार रुपयांचा देखभाल खर्च करण्यात येणार आहे.

या आयओटी आणि डेटालिटीक्स आधारी मशीन्समध्येमध्ये नॅपकीन किती शिल्लक आहे आणि मशीनची सद्यस्थिती काय आहे याची माहिती संगणक व मोबाईल अॅपवर मिळू शकणार आहे. ही मशीन महिला सहजपणे हाताळू शकतील. या मशीनमध्ये सॅनेटरी नॅपकीनची क्षमता ४५ ते ६० एवढी असेल त्या नियमितपणे पुनर्भरणा करण्याची जबाबदारी कंत्राटदाराची असेल. याशिवाय दिवसाला इन्सिलेटरमध्ये १५० नॅपकीनची विल्हेवाट लावता येणार आहे. मुंबईमध्ये सध्या विविध प्रकारची १० हजार ६८३ सार्वजनिक शौचालये असून त्यातील ५ हजार शौचालयांमध्ये या मशीन्स लावल्या जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

(हेही वाचा – आयुक्तांना पडला पर्यावरण पुरक इलेक्ट्रीक वाहनाचा विसर, स्वत:साठी खरेदी केले पेट्रोल वाहन)

मुंबईमध्ये यापूर्वी फेब्रुवारी २०१८ मध्ये महापालिका शाळांमधील इयत्ता ९ व १०वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकीन आणि वेंडींग मशीन्स आणि बर्निंग मशिनचा पुरवठा करण्याचे कंत्राट दिले होते. त्यावेळी ३४४ सॅनिटरी वेंडींग मशीनची खरेदी केली होती आणि यावर १ कोटी रुपये खर्च करण्यात आले. यामध्ये साडेचार हजार रुपयांमध्ये प्रत्येकी मशीन्स आणि बर्निंग मशीन्स ही मोनोकेम इंडस्ट्रीज या कंपनीकडून खरेदी करण्यात आली होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here