बिबट्याचा वावर असलेल्या जंगलात जी-२० च्या सदस्यांसाठी नियमांची पायमल्ली… पहा कुठे घडला प्रकार

175

बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जी-२० सदस्यांच्या भेटीदरम्यान उद्यान प्रशासनाने पाहुणचारासाठी थेट जंगलातील अतिसंरक्षित भागात सांगितीक कार्यक्रमाचा घाट घातला. जंगल हे शांतता क्षेत्र असल्याने थेट अतिसंरक्षित क्षेत्रात लाऊडस्पीकर, माईकचा वापर करत सांगितीक कार्यक्रमाचे आयोजन करणे हे नियमबाह्य असल्याचा आरोप पर्यावरणतज्ज्ञांनी केला आहे. या प्रकरणी उद्यानाचे संचालक व वनसंरक्षक जी मल्लिकार्जून यांनी मौन बाळगले आहे. ऐन हिवाळी अधिवेशनाच्या काही दिवसांपूर्वीच खुद्द वनाधिका-यांनी नियम धाब्यावर बसवल्याने या वादावर आता वनमंत्री सुधीर मुनगंटीवार काय भूमिका घेणार, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

( हेही वाचा : वीर सावरकरांच्या तैलचित्राविषयी बोलण्यास महाविकास आघाडीचा नकार)

शुक्रवारी १६ डिसेंबरला मुंबई भेटीला आलेल्या जी-२०च्या सदस्यांनी बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली. पर्यावरण संवर्धनाचे संदेश देणा-या जी-२० च्या सदस्यांनी क्षेत्र भेटीदरम्यान कान्हेरी गुंफा तसेच अतिसंरक्षित भागांतील लॉगहट या सरकारी बंगल्याला भेटी दिल्या. लॉगहट येथे जी-२० सदस्यांच्या मनोरंजनासाठी उद्यान प्रशासनाने खास सांगितीक कार्यक्रमाचे आयोजन केले. गायक, वादक यांच्यासह तबला, बासरी यांचा आवाज घुमण्यासाठी माईक आणि लाऊडस्पीकर्सही वापरले गेले. या कार्यक्रमांसाठी लॉगहट येथे छोटा स्टेजही उभारण्यात आला.

अतिसंरक्षित क्षेत्रात पर्यटकांना प्रवेश निषिद्ध असल्याने या प्रकाराबाबत सर्वसामान्य जनतेला काहीच थांगपत्ता लागला नाही. समाजमाध्यमांवर कार्यक्रमाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर पर्यावरणतज्ज्ञांना घडलेल्या प्रकाराची माहिती मिळाली. हा प्रकार कोणाच्या परवानगीने आयोजित करणायात आला, असा प्रश्न सर्वांकडून उपस्थित करण्यात आला आहे. जंगलाचे नियम धाब्यावर बसवून उद्यान प्रशासनावर वरिष्ठ वनाधिका-यांनी या प्रकरणाबाबत जाब विचारला की नाही, असा प्रश्नही पर्यावरणप्रेमी उपस्थित करत आहेत. या प्रकरणी पश्चिम (वन्यजीव) वनविभागाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. व्ही क्लेमेंट बॅन यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

पर्यावरणतज्ज्ञांचा आक्षेप

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे शांतता क्षेत्र आहे. शांतता क्षेत्रातील अतिसंरक्षित विभागांत काही खास लोकांसाठी नियम धाब्यावर बसवणे चुकीचे आहे. ध्वनी प्रदूषणामुळे बिबट्याच्या अधिवासावर परिणाम होऊ शकतो. प्राणी-पक्ष्यांच्या प्रजनन प्रक्रियेत बाधा येऊ शकते. त्यांना पिल्लांना दूध पाजताना, अन्न भरवताना त्रास होतो. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाने कायदेशीर नियमांचे उल्लंघन केले आहे.
– सुमैरा अब्दुलली, संस्थापिका, आवाज फाऊंडेशन

सांगितीक मनोरंजाचे कार्यक्रम जंगलातील अतिसंरक्षित भागांत करता येत नाही. या कार्यक्रमासाठी लाऊडस्पीकर्सही वापरले गेले. जंगलातील सर्व नियम या कार्यक्रमाच्या आयोजनामुळे पायदळी तुडवले गेले. जी-२०चे सदस्य पर्यावरणसंवर्धनासाठी जनजागृती करत आहेत. त्यांना अतिसंरक्षित प्रदेशात नियम डावलून मनोरंजनाच्या कार्यक्रमात वनाधिका-यांनी आणले, याची कल्पना नसावी. जी-२० च्या सदस्यांच्या क्षेत्रभेटीची जबाबदारी परराष्ट्र खात्याने घेतली होती. त्यांना तसेच वनविभागाला सांगितीक मनोरंजनाचा कार्यक्रम कान्हेरी गुंफा येथेही करता आला असता.
– देबी गोएंका, पर्यावरणतज्ज्ञ

जागतिक पातळीवर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची प्रतिमा या प्रकारामुळे मलीन झाली. अतिसंरक्षित क्षेत्रात लोकांची गर्दी होणे, ध्वनी प्रदूषण करणे हा धिंगाणा हा जागतिक पातळीवर चर्चिला जाईल. जी-२० च्या सदस्यांना उद्यान प्रशासननाने जंगल संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती देणे अपेक्षित आहे. अशा सांगितीक कार्यक्रमांच्या तमाशाने प्रसिद्धी मिळवणे योग्य नाही. भविष्यात पाहुण्यांकडून पुन्हा अशा पद्धतीच्या सांगितीक कार्यक्रमांची मागणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
– शार्दुल बाजीगर, पर्यावरणतज्ज्ञ

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.