प्रदीप शर्मासह संतोष शेलार, आनंद जाधवला न्यायालयीन कोठडी

या प्रकरणात पैसाची मोठ्या प्रमाणात देवाण-घेवाण झाली. तसेच काही पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला आहे, त्याचा शोध घ्यायचा आहे, असे एनआयएच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले.

201

अंबानी स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी अटकेत असलेले प्रदीप शर्मा, संतोष शेलार आणि आनंद जाधव या तिघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. १२ जुलैपर्यंत ही कोठडी सुनावण्यात आली आहे. यावेळी प्रदीप शर्मा याने त्याला विशेष कारागृहात पाठवण्यात यावे, अशी मागणी न्यायालयात केली.

पुरावे नष्ट केल्याचा आरोप!

तळोजा कारागृहातील प्रशासनाने शर्माच्या अर्जाची योग्य ती दखल घ्यावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. मनसुख हिरेन यांच्या हत्येमध्ये मनीष सोनी आणि सतीश मोटकर या दोघांचा सहभाग आहे. मनीष हा हत्येसाठी वापरण्यात आलेली गाडी चालवत होता. दोन्ही आरोपी या हत्या प्रकरणात महत्वाचे पुरावे आहेत. त्यामुळे आम्हाला अधिक तपास करायचा आहे, असे एनआयएच्या वकिलाने न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले. या प्रकरणात पैसाची मोठ्या प्रमाणात देवाण-घेवाण झाली. तसेच या दोघांनी परदेशात प्रवास केल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणात काही पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला आहे, त्याचाही शोध घ्यायचा आहे, असेही वकिलांनी न्यायालयात सांगितले. दरम्यान मनीष सोनी आणि सतीश मुठेकर या दोघांना एनआयएची कोठडी सुनावण्यात आली आहे.

(हेही वाचा : प्रदीप शर्माला अखेर अटक!)

प्रदीप शर्माची वादग्रस्त पार्श्वभूमी!

एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा याच्या अंधेरीमधील घरावर हा छापा टाकण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रदीप शर्माच्या घऱाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला. उद्योगपती मुकेश अंबानी धमकी प्रकरणात एनआयएने याआधी माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा याची चौकशी केली होती. अंबानी यांना धमकी आणि व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येशी शर्मा यांचा संबंध असावा, असा संशय एनआयएला आहे. शर्मा याला लखनभैया बनावट चकमक प्रकरणी अटक झाली होती. सुमारे तीन वर्षे तो कारागृहात होता. मनसुख हत्येप्रकरणी एनआयएने अटक केलेला निलंबित पोलिस शिपाई विनायक शिंदे लखनभैया हत्या प्रकरणात सहआरोपी होता. या गुन्ह्यातून शर्मा वगळता उर्वरित सर्व आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा ठोठावली. निर्दोष मुक्त झाल्यानंतर शर्मा यालाही पुन्हा सेवेत घेण्यात आले. सध्या चर्चेत असलेले परमबीर सिंह ठाणे शहरात पोलिस आयुक्त असताना शर्मा याच्याकडे तेथील खंडणीविरोधी पथकाच्या प्रमुखपदाची जबाबदारी होती. शर्मा यांच्याकडे ७ एप्रिलला सुमारे आठ तास चौकशी केल्यानंतर ८ एप्रिलला त्याला एनआयएने पुन्हा चौकशीस बोलावले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.