ससून रुग्णालयाच्या (Sassoon Hospital) अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर उपचार घेणाऱ्या रुग्णाचा उंदीर चावल्याने मृत्यू झाला, अशी तक्रार नातेवाइकांनी प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान, रुग्णाचा मृत्यू उंदीर चावून झाला नसून, अपघातात मणक्याला जबरी मार लागल्याने झाल्याचे रुग्णालय प्रशासनातर्फे सांगण्यात आले. मात्र, तक्रारअर्जाची गंभीर दखल घेऊन चौकशी समितीही नेमण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली.
सागर रेणुसे (वय ३०, रा. वेल्हे) यांचा दुचाकीवरून प्रवास करताना पुलावरून पडून १५ मार्चला अपघात झाला. त्यांना ससून रुग्णालयात १७ मार्चला उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर २६ मार्चला शस्त्रक्रिया करण्यात आली. याच दरम्यान, त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे २९ मार्चपासून रुग्णाला व्हेंटिलेटर ठेवण्यात आले.
(हेही वाचा – IPL 2024 : आयपीएलच्या ‘या’ दोन सामन्यांचा दिवस बदलला, वेळापत्रकात सूक्ष्म बदल )
रुग्णालयात आणल्यापासून रुग्णाची प्रकृती चिंताजनक होती. त्याचे प्राण वाचविण्यासाठी अस्थिरोग विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक सातत्याने पाठपुरावा करीत होते, पण रुग्णाचा उपचारांना प्रतिसाद मिळत नव्हता. याच दरम्यान, रुग्णाचा १ एप्रिलला रात्री मृत्यू झाला. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाइकांनी हा मृत्यू उंदीर चावल्याने झाला, अशी लेखी तक्रार ससून रुग्णालय प्रशासनाला केली. ससून रुग्णालयाच्या परिसरात नियमित पेस्ट कंट्रोल केले जाते. नुकतेच झालेल्या पेस्ट कंट्रोलच्या पावत्याही रुग्णालय प्रशासनाने दाखविल्या. या प्रकरणात मृताच्या नातेवाईकांशी संपर्क साधला असता त्यांनी पोलीस गुन्हा दाखल करून घेत नसल्याचे सांगितले.
शवविच्छेदनातही उंदीर चावल्याची खूण नाही
वैद्यकीयदृष्ट्या रुग्णाचा मृत्यू हा अपघातात मणक्याला गंभीर इजेमुळे झाला आहे. रुग्णाच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात जखमा होत्या. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदनातही उंदीर चावल्याची कोणतेही खूण दिसलेली नाही. त्यामुळे रुग्णाचा मृत्यू उंदीर चावल्याने झाला, असे निश्चितपणे म्हणता येणार नाही. मात्र, मृताच्या नातेवाइकांनी या संदर्भात केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेण्यात आली आहे, अशी माहिती बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी दिली आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community