३६ तास उलटले तरी आंबेघर मदतकार्यापासून वंचित!

आंबेघर गावातील सात ते आठ घरे ढिगाऱ्याखाली गेली. या दुर्घटनेत १६ जण बेपत्ता झाले आहेत.

ज्याप्रमाणे महाड येथील तळीये गावावर दरड कोसळल्याने जीवितहानी झाली तशीच दुर्घटना सातारा जिल्ह्यातील पाटणा तालुक्यातील आंबेघर गावामध्ये घडली. या ठिकाणी घरांवर दरड कोसळल्याने त्याखाली १६ जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. याठिकाणी ३६ तास उलटले तरी अजून एनडीआरएफची टीम पोहचली नाही. या ठिकाणी दुर्दैवाने स्थानिक नागरिक कोणत्याही साधनसामुग्रीशिवाय बचाव कार्य करत आहेत.

आंबेघर दुर्गम भागात वसलेले!

या ठिकाणी अतिवृष्टीमुळे डोंगर खचून आंबेघर गावात गुरुवारी रात्री दरड कोसळली. या दुर्घटनेत गावातील सात ते आठ घरे ढिगाऱ्याखाली गेली. या दुर्घटनेत १६ जण बेपत्ता झाले आहेत. हे सर्व जण मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत अशी शंका आहे. या दुर्घटनेनंतर गावात एकच हाहाकार उडाला आहे. मात्र दुर्दैवाने ही घटना घडून ३६ तास उलटले तरी अजून याठिकाणी सरकारी बचाव पथके पोहचले नाहीत. एनडीआरएफची टीम अद्याप पोहोचू न शकल्याने बचावकार्यही सुरू झाले नाही. कारण हे गाव दुर्गम भागात वसलेले असून रस्ते खचलेले आहेत. त्यामुळे लोकांचा आक्रोश सुरू आहे. सततच्या पावसामुळे साताऱ्यातील अनेक डोंगरभाग खचले आहेत. जिल्ह्यातील कोंडावळे गावात गुरुवारी संध्याकाळी माळीण सारखी दुर्घटना घडली. दरड कोसळून गावातील घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली दबली गेली. बचाव पथकाने तातडीने हालचाली करून २७ जणांना बाहेर काढले.

कृष्णाने धोक्याची पातळी ओलांडली

दरम्यान कृष्णा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. महाबळेश्वर येथे आणि वाई तालुक्यात राज्याच्या तुलनेत सर्वाधिक पाऊस कोसळला. त्यामुळे कृष्णा नदीच्या पात्रात वाढ झाली आहे. कृष्णा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदीकाठची गवे रिकामी करण्याच्या कामाला जोर आला आहे. आतापर्यंत १८९ कुटुंबांतील ७५५ लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here