दोन ऑलिव्ह रिडले कासवांना गुहागर किनाऱ्यावर सॅटेलाईट टॅगिंग करण्यात आले आहे. कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या ऑलिव्ह रिडले कासवांचा समुद्रातील भ्रमण मार्ग शोधण्यासाठी हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
( हेही वाचा : “हे मातृभूमी तुजसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण”, स्वातंत्र्यवीर सावरकरांना सोशल मीडियावर अभिवादन )
ऑलिव्ह रिडले कासवांना उपग्रह टॅगिंग
गेल्या वर्षी पाच ऑलिव्ह रिडले कासवांना सॅटेलाईट टॅगिंग करण्यात आले होते. मात्र, ते सॅटेलाईट टॅग खराब निघाल्याने प्रकल्प अर्ध्यावरच राहिला होता. राज्याचा कांदळवन कक्ष आणि डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवण्यात येत आहे.
वन खात्याच्या कांदळवन कक्षाने ऑलिव्ह रिडले कासवांना सॅटेलाईट टॅगिंग करून त्या माध्यमातून समुद्रातील त्यांचा भ्रमणमार्ग शोधण्यासाठी प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाअंतर्गत मागील वर्षी पाच कासवांना सॅटेलाईट टॅग करण्यात आले होते. त्यापैकी चार कासवांचा संपर्क तुटला होता. ज्या कंपनीकडून हे सॅटेलाईट टॅगिंग खरेदी करण्यात आले, त्या कंपनीने दिलेल्या मुदतीच्या आतच ते टॅग खराब झाले. यावर लाखो रुपये खर्च करण्यात आला होता. म्हणूनच कंपनीने अतिरिक्त पैसे न घेता नवीन सॅटेलाईट टॅग दिले आहेत. त्यामुळे यावर्षी पुन्हा नव्याने या प्रकल्पाला सुरुवात झाली आहे.