हातात ‘मी सावरकर’ लिहिलेले फलक आणि मस्तकी भगवी टोपी परिधान करीत रविवारी सर्वसामान्य मुंबईकर ‘वीर सावरकर गौरव यात्रे’त सहभागी झाले. ‘वीर सावरकर झिंदाबाद’, ‘सावरकर जी के सम्मान मे, भाजपा-शिवसेना मैदान मे’, अशा घोषणांनी संपूर्ण दादर-माहिम परिसर दुमदुमून गेला.
स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत काँग्रेसकडून वारंवार होत असलेल्या अवमानकारक वक्तव्यांचा निषेध करण्यासह सर्वसामान्य जनतेला सावरकरांचा इतिहास आणि त्यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाची माहिती देण्यासाठी ३० मार्चपासून ६ एप्रिलपर्यंत राज्यातील २८८ मतदार संघात सावरकर गौरव यात्रा काढण्याचा संकल्प भाजपा आणि शिवसेनेने सोडला आहे. रविवारी, २ एप्रिलला दादर-माहिम मतदारसंघात ‘वीर सावरकर गौरव यात्रा’ काढण्यात आली. त्यात भाजपाचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार, आमदार सदा सरवणकर, भाजपाच्या माहिम विधानसभा अध्यक्ष अक्षता तेंडुलकर, समाधान सरवणकर यांच्यासह भाजपा-शिवसेनेच्या कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
ढोल-ताशांचा गजर
ढोल-ताशांचा गजर आणि लेझिमच्या तालावर दादरमधील सावरकर सदनापासून यात्रेला सुरुवात झाली. त्यानंतर सेनापती बापट मार्ग, प्लाझा सिनेमा, शिवसेना भवन, माहिम, शिवाजी पार्क असा प्रवास करीत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात यात्रेची सांगता झाली. वीर सावरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांची वेशभूषा साकार केलेले तरुण यात्रेचे विशेष आकर्षण ठरले. शालेय विद्यार्थीनी, तरुणी आणि महिला पारंपरिक वेशात यात्रेत सहभागी झाल्या. ‘मी सावरकर’ असे फलक हातात घेत, डोक्यावर भगवी टोपी परिधान करीत सावरकर नामाचा जयघोष करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात पारंपरिक वेशातील महिला आणि तरुणींनी लेझिमवर ताल धरला.
Join Our WhatsApp Community