तुमच्या परिसरात येणा-या झाडांची जबाबदारी तुमची असं म्हणत पालिकेने पुन्हा एकदा झाडांची काळजी घेण्याची जबाबदारी नागरिकांवरच टाकली आहे. मुंबईत सुमारे 29 लाख झाडे आहेत. त्यातील 15 लाख झाडे खासगी भूखंडांवर आहेत. खासगी भूखंडांवर असलेल्या झाडांची देखभाल तिथल्या नागरिकांनीच करण्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.
झाडे पडण्याच्या घटना अधिक
नागरिकांनी आपल्या परिसरातील झाडांची नियमित पाहणी करावी आणि झाडांवर किडीचा किंवा बुरशीचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून पालिकेच्या उद्यान विभागातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा व तशा उपाययोजना कराव्या, असे आवाहन पालिकेच्या उद्यान विभागाने नागरिकांना केले आहे. दरवर्षी पावसाळ्यात झाडे उन्मळून पडतात किंवा झाडांच्या फांद्या तुटून अपघात होतात. त्यात अनेकदा जीवित हानी होते. त्यामुळे पालिकेच्या उद्यान विभागातर्फे दरवर्षी रस्त्यावरील झाडांच्या अस्ताव्यस्त वाढलेल्या फांद्यांची छाटणी केली जाते. मात्र खासगी भूखंडावरील झाडांची छाटणी संबंधित नागरिकांना करवून घ्यावी लागते. तरीही झाडे पडण्याच्या दुर्घटना घडत असतात.
( हेही वाचा :कोणत्या इस्लामी देशांत कोणत्या कारणांसाठी आहे बुरखा, हिजाबवर बंदी? जाणून घ्या…)
वेळोवेळी तपासणी करावी
विविध सोसायट्या, बंगले, विविध संस्था इत्यादींच्या मोकळ्या जागांमध्ये असलेल्या वृक्षांची, झाडांची नागरिकांनी तपासणी करावी, त्याकरता सोसायटीच्या वा संस्थेच्या पदाधिका-यांनी पालिकेच्या विभाग कार्यालयातील वृक्ष अधिकारी किंवा सहाय्यक उद्यान अधीक्षक यांच्याशी संपर्क साधावा व त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपल्या परिसरातील झाडांची तपासणी वेळोवेळी करुन घ्यावी, असे आवाहन पालिकेच्या उद्यान खात्याने केले आहे.
Join Our WhatsApp Community