तुम्ही SBI बॅंकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. SBI बॅंकेने वैयक्तिक कर्ज देण्यासाठी नवीन सेवा सुरू केली आहे. SBI ने YONO अॅपवर रिअल टाइम एक्स्प्रेस क्रेडिट नावाची सुविधा लॉंच केली आहे. रिअल टाईम एक्स्प्रेस क्रेडिट या सुविधेमुळे ग्राहक ३५ लाखांपर्यंतचे कर्ज घरबसल्या सहज घेऊ शकतील. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन होणार असून क्रेडिट तपासणी, कर्जाची पात्रता, कर्ज मंजूरी, कागदपत्रे जमा करणे ही सर्व कामे ऑनलाइन करण्यात येणार आहेत.
( हेही वाचा : वीकेंडला फिरायला जाताय? गडकिल्ले, पर्यटनस्थळांवर या तारखेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू)
घरबसल्या कर्ज
कर्जासाठी ग्राहकांना बॅंकेत जाण्याची गरज भासणार नाही आणि घरबसल्या डिजिटल माध्यमातून सर्व कामे होतील. पगारदार वर्गासाठी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. आरटीएक्ससी अंतर्गत वैयक्तिक कर्ज घेणाऱ्या ग्राहकांची पात्रता तपासण्यासह कागदपत्रांची पडताळणी आणि इतर प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल होतील असे SBI ने जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. अॅपद्वारे वैयक्तिक कर्ज घेण्याची सुविधा विशेषत: पगारदार वर्गाला लक्षात घेऊन सुरू करण्यात आली आहे. ज्या ग्राहकांचे पगार खाते SBI मध्ये आहे त्या ग्राहकांना या सुविधेचा अधिक फायदा होईल असेही SBI ने सांगितले आहे.
कोणाला मिळणार कर्ज
- ज्यांचे वेतन/पगार खाते SBI मध्ये आहे.
- ज्यांचे किमान वेतन १५ हजार प्रतिमहिना आहे.
- केंद्र आणि राज्य सरकारचे कर्मचारी, राष्ट्रीय स्तरावरील नामांकित शैक्षणिक संस्थांचे कर्मचारी, बॅंकेशी संलग्न कर्मचारी, निवडक खाजगी कंपन्यांचे कर्मचारी देखील या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.