कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करत शाळा उघडण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. पण मुलांना शाळेत सोडणा-या स्कूल बसेस मात्र अजून धावायला तयार नाहीत. कोरोना काळात झालेल्या नुकसानाची भरपाई राज्य सरकारकडून होत नाही, तोपर्यंत स्कूल बसेस धावणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
घटले स्कूल बसेसचे आयुर्मान
कोरोनामुळे मागच्या दोन वर्षांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे राज्यभरातील 40 हजार स्कूल बसेस पूर्ण वेळ बंद होत्या. शिवाय बसेसवरील कर्मचारी बेरोजगार झाल्याने स्कूल बसेसच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला. स्कूल बसेसचे आयुर्मान सुद्धा दोन वर्षाने घटले असून, याची भरपाई राज्य सरकारकडून मिळेपर्यंत राज्यभरात एकही स्कूल बस धावणार नाही, असा निर्णय बुधवारी नवी मुंबईत पार पडलेल्या ओनर्स असोसिएशनच्या बैठकीत घेण्यात आला.
(हेही वाचाः आंदोलन करा, पण… शेतकरी संघटनांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले)
घेतले चार मोठे निर्णय
या बैठकीत चार मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. मुंबई उपनगरातील स्कूल बसेसचे आयुर्मान 15 वर्षांचे आहे. त्यामुळे मुंबई उपनगरासह इतर जिल्ह्यांतील सर्व स्कूल बसेसला आता दोन वर्षांचे आयुर्मान वाढवून देण्यात यावे, डिझेल दरात सवलत, कागदपत्रांना डिसेंबर पर्यंत मुदतवाढ आणि बॅच असलेल्या स्कूल बस चालकांना बेस्टने कामावर घेतल्याने प्रशिक्षित चालकांना नियुक्त करण्यासाठी सुद्धा वेळ देण्यात यावा, अशी मागणी स्कूल बस ओनर्स असोसिएशनने केली आहे.
Join Our WhatsApp Community