कोरोना विषाणूपासून शालेय मुलांचे रक्षण व्हावे, संभाव्य चौख्या लाटेपासून कुटुंबाबरोबरच लहान मुलांनाही सुरक्षा कवच लाभावे, यासाठी १६ मार्चपासून १२ ते १४ वयोगटातील मुलांना कोर्बोव्हॅक्स लस दिली जात आहे. शालेय स्तरावर नियोजन करत मुलांचे लसीकरण सुरू झाले आहे. परंतु, अनेक शाळांमध्ये मुलांना सर्दी, खोकला व ताप यासारखी लक्षणे असल्याने मुलांनी डोस घेतलेले नाहीत. सोलापूरातील शहरातील बऱ्याच शाळांमध्ये बोर्डाची दोन सत्रांत परीक्षा असल्याने मुलांच्या लसीकरणाचे नियोजन करणे शक्य झाले नाही. तर बऱ्याच शाळा सकाळच्या सत्रात असल्याने त्यानुसार नियोजन करत लसीकरण केले जात आहे.
( हेही वाचा : …तर तुम्ही सॅंडविच खाणे सोडून द्याल! )
आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली बैठक
१२ ते १४ वयोगटातील मुलांना कोर्बोव्हॅक्स लस दिली जात आहे. सोलापूर शहरात ५२ हजार १७७ तर ग्रामीण भागात १ लाख ९० हजार ३९० लाभार्थी आहेत. लसीकरणास कमी प्रतिसाद मिळत असल्याने पालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली. यावेळी बऱ्याच शाळांतील मुख्याध्यापकांनी सहभाग नोंदवला. गेल्या दोन दिवसांपासून सोलापूरातील मनपा कॅम्प शाळेतील मुलांसाठी ढेपे प्रशाला, आदर्श विद्यालय, केएलई, सेंट जोसेफ यासह सुयश विद्यालयात लसीकरण घेण्यात आले. आठवड्याभरात शहरातील ३ हजार ६४ शालेय मुलांना कोर्बोव्हॅक्स लसीचा डोस दिला आहे.
लस घेण्यासाठी नकार
शहरातील बऱ्याच शाळांमध्ये सध्या दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू असल्यामुळे शाळा सकाळच्या सत्रात भरत आहेत. त्यामुळे पालकही मुलांना आरोग्य केंद्रात नेऊन लस देण्यासाठी सकारात्मक नाहीत. मात्र ज्या शाळांमध्ये लस देण्याचे नियोजन केले जात आहे त्या शाळांमध्येही बरीच मुलं लस घेण्यासाठी नकार देत आहेत. पालकांनी आपल्या मुलांना लस घेण्यासाठी तयार करणे आवश्यक आहे. संभाव्य चौथ्या लाटेपासून बचाव केला पाहिजे, असे पालिका आरोग्य विभागाने सांगितले आहे.
Join Our WhatsApp Community