शाळा बंद, तर आदर्श शिक्षक पुरस्कारही बंद! राज्य सरकारचा शिक्षकांसोबत विचित्र ‘व्यवहार’! 

मागील वर्षी केंद्र सरकारने राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्यांची निवड करुन त्यांना पुरस्कारही प्रदान केले. यावर्षीही प्रक्रिया सुरु केली. राज्य सरकारने मात्र मागील वर्षी राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार दिले नाही. यावर्षीही निवड प्रक्रिया सुरु केली नाही. 

कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यभर शाळा बंद आहेत, म्हणून राज्य सरकारने दरवर्षी देत असलेले आदर्श पुरस्कार बंद केले आहेत. मागील वर्षी हे पुरस्कार घोषित केले नाही आणि यंदाच्या वर्षीही अजून निवड प्रक्रिया सुरु झाली नाही. याबद्दल शिक्षकांमध्ये कमालीची नाराजी आहे. शाळा बंद असल्या तरी शिक्षक ऑनलाईन वर्ग घेत आहेत, नेमून दिलेली सर्व कामे वेळच्यावेळी पूर्ण करत आहेत, शासनाच्या सर्व उपक्रमातही शिक्षकांचा सहभाग आहेच. शिक्षकांचे योगदान चालूच आहे. असे असताना शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कारांपासून का वंचित ठेवले जात आहे ? असा प्रश्न राज्यभरातील शिक्षकांकडून उपस्थित केला जात आहे.

(हेही वाचा : दहावीच्या निकालाबाबत शिक्षकांमध्येच संभ्रम! निकाल अंदाजे लावणार?)

केंद्राचे पुरस्कार जाहीर मग महाराष्ट्राचे का नाही? 

मागील वर्षी केंद्र सरकारने राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्यांची निवड करुन त्यांना पुरस्कार प्रदान केले आहेत. यावर्षीही राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देण्यासंदर्भात केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रायलाकडून आवेदन पत्रे मागवण्यात आलेली आहेत. यासंदर्भात राज्याच्या शिक्षण संचालकांनी १  जून २०२१ रोजी माहिती करीता पत्रही निर्गमित केलेले आहे. केंद्र सरकारने मागील वर्षी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान केले आहेत. यावर्षीही आदर्श शिक्षक पुरस्कार देण्याची कार्यवाही सुरु केलेली आहे. परंतु राज्य सरकारकडून मागील वर्षी राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारांची निवड करण्यात आलेली नाही. यावर्षीही राज्य स्तरावर शिक्षक पुरस्कार देण्याबाबत कोणतेही परिपत्रक काढलेले नाही. निवड समिती तसेच निवड प्रक्रियेची कार्यवाहीसुध्दा अद्याप घोषित करण्यात आलेली नाही. ही खेदाची बाब असून हे शिक्षकांच्या कार्याची दखल न घेण्यासारखेच आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या मुंबई विभागाने नाराजी व्यक्त केली. तसे पत्रच शिक्षक परिषदेने शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना दिले आहे.

 

(हेही वाचा : मागील इयत्तांच्या निकालांवर १२वीचा निकाल?)

कोविड काळातही शिक्षकांचा शासकीय मोहिमांमध्ये सहभाग!

खरे तर कोरोना काळातही आॅनलाईन अध्यापनासोबतच बी.एल.ओ. ची कामे, कोविड काळात रूग्णालयात मदतनीस, धान्य वाटप करणे, पुस्तके वाटप करणे, बालरक्षक मोहिम राबवणे, अनुषंगिक मुल्यमापनाची सर्व कामे करणे तसेच शिक्षण विभागाने निर्गमित केलेल्या आदेशानुसार सर्व कामे पूर्ण करणे अशी कामे शिक्षक करतच आहेत. शिक्षकांना त्यांच्या कार्याची दखल घेणारी, आनंदाची, प्रेरणादायी बाब  म्हणजे राज्य पुरस्कार आहे. नेमके त्यापासूनच शिक्षकांना दूर का ठेवले जात आहे?  त्यामुळे मागील वर्षीच्या देय्य असलेल्या राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारांची निवड करणे व यावर्षीच्या शिक्षक पुरस्कारांची निवड स्वतंत्रपणे करण्यात यावी, अशी मागणी करत दोन्ही वर्षीच्या पात्र असलेल्या शिक्षकांसाठी राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा कोविडची परिस्थिती सामान्य झाल्यानंतरही आयोजन करावे असेही शिक्षक परिषदेने पत्राद्वारे सुचवले आहे. मागील वर्षी या बाबतीत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मुंबईने पत्रव्यवहार केला होता, पण शालेय शिक्षण विभागाने सकारात्मक निर्णय घेतला नाही, अशा नाराजीही व्यक्त करण्यात आली आहे.

(हेही वाचा :दहावीच्या निकालाबाबत शिक्षकांमध्येच संभ्रम! निकाल अंदाजे लावणार?)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here