शिक्षकांच्या लोकल प्रवासाच्या विषयावर शालेय शिक्षण विभाग ढिम्मच! 

येत्या २ दिवसांत जर शिक्षकांना लोकल प्रवासाची परवानगी दिली नाही, तर १०वीच्या निकालावर बहिष्कार टाकू, असा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने दिला आहे. 

१५ जूनपासून राज्यातील शाळा सुरु झाल्या आहे. सरकारच्या परिपत्रकानुसार १ली ते ९वी आणि ११वीसाठी ५० टक्के तर १०वी आणि १२वीसाठी १०० टक्के शिक्षकांची उपस्थिती असावी, असे म्हटले आहे. मात्र मुंबई शहर आणि उपनगर जेथे ७० टक्के शिक्षकांना मुंबई बाहेरून यावे लागते, त्यांना लोकल प्रवासाशिवाय पर्याय नाही. म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, मुंबई विभागाच्या वतीने विना तिकीट लोकल प्रवास करून आंदोलन केले. त्याला ३ दिवस झाले तरी शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांना लोकल प्रवासाला परवानगी मिळावी म्हणून प्रयत्नच सुरु केले नाहीत. त्यामुळे शिक्षकांना सध्या तरी विना तिकीट लोकल प्रवास अथवा दंड भरून प्रवास करावा लागत आहे.

…तर १०वीच्या परीक्षेवर बहिष्कार!      

सविनय कायदेभंग आंदोलन केल्यानंतर शिक्षकांना १०वीच्या निकालासाठी लोकल प्रवासासाठी परवानगी फाईल शिक्षण विभागाने उशिरा तयार केली‌‌. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद २ दिवस सतत सचिव व मंत्री पातळीवर यासाठी प्रयत्न करीत होती. २ दिवस फाईल हलत नव्हती. १६ जून रोजी शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांची आपण भेट घेतली. त्यावेळी राज्यमंत्री कडू यांनी या विषयावर मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. येत्या २ दिवसांत निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले असल्याचे आपण परिषदेचे मुंबई विभागाचे सहकार्यवाह शिवनाथ दराडे यांनी दिली. दरम्यान या विषयावर येत्या २ दिवसांत निर्णय न झाल्यास शिक्षक परिषदेने तीव्र आंदोलनाचा इशारा अगोदरच दिलेला  त्यात बहिष्काराचाही सामावेश असेल तेव्हा  १० वीच्या  निकालाची जबाबदारी सरकारची राहील. तसेच १४ जूनच्या शिक्षण संचालक कार्यालयाच्या परिपत्रकातील  ५० टक्के व १०० टक्के शिक्षक उपस्थितीची अट न पाळल्यास रजा कापणे किंवा अन्य शालेय कारवाईचे बंधन आमच्यावर असणार नाही. यास शासन जबाबदार राहील, असा इशाराही दराडे यांनी दिला.

(हेही वाचा :दहावीच्या मूल्यांकनासाठी शिक्षकांना भरावा लागतोय दंड!)

शालेय शिक्षण मंत्र्यांच्या निवेदनात लोकल प्रवासाचा उल्लेख नाही! 

राज्यातील शाळा दरवर्षी सर्वसाधारणपणे १५ जूनला तर विदर्भात २६ जूनपासून शाळा सुरु होतात. त्याप्रमाणे राज्यातील काही शाळांची ऑनलाईन सुरुवात झाली असून सर्व विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक वर्षात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्वागत केले आहे. यासंबंधी त्यांनी सर्व शिक्षक आणि पालकांना संदेश दिला, त्यामध्ये त्यांनी मुंबईतील सुमारे १७ ते १८ हजार शिक्षकांना लोकल प्रवासाविना शाळेत पोहचणे कठीण बनले आहे. या समस्येचा साधा उल्लेखही मंत्री गायकवाड यांनी संदेशात केला नाही. मंत्री गायकवाड म्हणाल्या, विद्यार्थ्यांसाठी पहिले पंधरा दिवस आणि पुढील एक महिन्यात मागील वर्षीच्या अभ्यासक्रमाची उजळणी वर्ग घेण्यात  येणार आहे. कोरोनामुळे शाळा सुरु करतांना मागील वर्षीप्रमाणे या वर्षीही ऑनलाईन शिक्षण सुरु केले आहे. गेल्या वर्षी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला गेला. व्हाट्सअप, युट्युब या सोबतच दूरदर्शन आणि इतर माध्यमांचा वापर करुन शिक्षण पोहचविण्यात आले. यासाठी शिक्षकांसह विद्यार्थी मित्र व इतर विविध उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षण उपलब्ध करून दिले. या वर्षी ब्रीज कोर्सची सोय उपलब्ध केली आहे. यात दहावीच्या विद्यार्थ्याला नववीचा अभ्यासक्रम शिकून सत्र दहावीसाठी लागणारा पाया मजबूत केला जाणार आहे. ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु करतांना विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नयेत, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे या कोरोना कालावधीत अनेक कारणांमुळे शाळा सुटलेल्या शाळा बाह्य मुलांचे सर्वेक्षण सुरु असून त्यांना परत शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन कार्यरत आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि त्यांची सुरक्षितता यालाच प्राधान्य देऊन आरोग्य विभागाच्या समन्वयाने येणाऱ्या काळामध्ये परिस्थिती बघून शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे मंत्री गायकवाड म्हणाल्या.

(हेही वाचा : मुंबईत निर्बंध, लोकल बंद, तरी सरकारचे फर्मान ‘शिक्षकांनो, शाळेत हजर व्हा!’)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here