अनिल गोरे
गेल्या काही वर्षांपासून इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे (School) पेव फुटले आहे. अनेक पालक स्वतःला इंग्रजी येत असो-नसो, खिशाला परवडो अथवा न परवडो केवळ प्रतिष्ठेचा प्रश्न म्हणून पाल्याला इंग्रजी माध्यमाच्या (English Medium) शाळांत घालू लागले. अनेक तज्ज्ञ मात्र विकसित मातृभाषेतून शिक्षण घेण्याविषयी आग्रही आहेत. मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी भरीव योगदान देणारे मराठीकाका म्हणून प्रसिद्ध असलेले अनिल गोरे (Anil Gore) यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळांची पोलखोल करून पालकांना पाल्याला मराठी माध्यमातून (Marathi Medium) शिक्षण देण्यासाठी कशा प्रकारे उद्युक्त केले, हे उलगडणारा लेख… (School)
०१/०१/२०११ ला मी पालकांसमोर केलेल्या एका भाषणात शैक्षणिक आशय विद्यार्थ्यांपर्यंत सहज, लवकर पोहचविण्यास उपयुक्त सोयी देवनागरी मराठीत आहेत; पण रोमन लिपीतील इंग्लिशकडे नाहीत, हे उदाहरणे देऊन सांगितले. अनुदानित मराठी शाळांमध्ये सर्व शिक्षक नियमानुसार किमान अर्हतेचे (qualification) असतात मात्र विनाअनुदान इंग्लिश माध्यमातील बहुसंख्य शिक्षक खूप कमी अर्हतेचे असतात हेही सांगितले. अनुदानित मराठी शाळांमध्ये शिक्षकांची नावे, त्यांची अर्हता लिहिलेला फलक असतो तसा विनाअनुदान इंग्लिश शाळेत नसतो, कारण हे शिक्षक पुरेसे शिकलेले नसतात, हेही मांडले. दोन्ही माध्यमांतील भाषिक आणि व्यवस्थापकीय भेद लक्षात घेऊन मुलांना इंग्लिश माध्यमामधून काढून मराठी माध्यमात दाखल करावे, असे सुचवले.
(हेही वाचा – Women CM’s in India : रेखा गुप्ता देशातील १८व्या महिला मुख्यमंत्री; याआधी कुणाला मिळाला बहुमान?)
मी याबाबत ७०० हून अधिक भाषणे महाराष्ट्रात दिली. २०११ मध्ये १२९ पालकांनी माझे मुद्दे पडताळून मुलांना इंग्लिश माध्यमामधून मराठी माध्यमात दाखल केले. महाराष्ट्रातील शैक्षणिक (Academic) भाषा माध्यम क्रांतीच्या प्रारंभाला आता बारा वर्षे होऊन गेली. हा बदल केल्यावर मुलांचे इंग्लिश व इंग्लिश व्याकरणाची जाण सुधारली असे अनेक पालकांनी कळविले. माझ्याकडील माहितीसोबत पालकांचे अनुभव मी पुढील काळात मांडले. पालकही वरील लाभ मित्रांना, नातेवाईकांना सांगू लागले. याचा परिणाम चांगला झाला. अनेक पालकांचे ऐकून लाखो पालकांनी स्वतः त्याची पडताळणी करून मुले इंग्लिश माध्यमामधून मराठी माध्यमात दाखल केली. बारा वर्षांत माझ्या भाषणांची संख्या कमी झाली पण, वरीलप्रमाणेच माध्यम बदलाचे प्रमाण वाढले. २०२३ पर्यंत इंग्लिश माध्यमातून काढून मराठी माध्यमात दाखल असा बदल केलेल्यांची संख्या अकरा लाखांच्या वर गेली.

पालकांनी माझ्यावर आंधळा विश्वास न ठेवता आपल्या मुलांच्या शाळेतील शिक्षकांच्या अर्हतेची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. अर्हता कमी असल्याने इंग्लिश शाळांनी माहिती देण्यास नकार दिला. पालकांनी इतर मार्गाने माहिती मिळवली. शुल्क भरमसाठ पण शिक्षक अर्हता कमी ही बाब विनाअनुदान इंग्लिश शाळांबाबत उघड झाल्याने अशा शाळेतील शिक्षक नीट शिकवू शकत नाहीत, सहसा नोकरी सोडून पळतात. विनाअनुदान शाळांना सरकारी अनुदान नाही; म्हणून सरकार शिक्षकांची अर्हता तपासत नाही. याचा लाभ घेऊन पालकांकडून भरमसाठ शुल्क घ्यायचे आणि अगदी कमी अर्हतेचे अगदी अपात्र उमेदवार कमी पैशात शिक्षक म्हणून नेमायचे या युक्तीने संस्थापकाने रग्गड पैसा मिळवायला या शाळा उपयोगी पडतात. आपले हे कृत्य लपवण्यासाठी अशा शाळा पालकांना शिक्षकांच्या अर्हतेची माहिती देत नाही. अत्यल्प वेतनात नाईलाजाने, नापसंतीने, इंग्लिश शाळेत असे तात्पुरते काम करणारे शिक्षक शिक्षकी पेशात अनुभवी होण्यापूर्वीच नोकरी सोडतात, म्हणून ते सेवेत असतानाही मुलांना त्यांच्याकडून सुयोग्य मार्गदर्शन मिळू शकत नाही. भारतीय संस्कृतीत गुरूचे अनन्य साधारण महत्व असल्याने शिक्षकाच्या शिक्षणाची चौकशीच पालक करत नसल्याने या शाळा चालवणाऱ्यांचे फावले. मी नेमकी ही बाब पालकांच्या लक्षात आणून देण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले.
(हेही वाचा – पाकिस्तानच्या ISI च्या पथकाने दिली बांगलादेशला भेट; भारत बनला सतर्क)
(लेखक महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा सल्लागार समितीचे सदस्य आहेत.)
हेही पाहा –