नागपूरात विद्यार्थी ‘हजर’!

नागपूर महापालिकेकडून मान्यता मिळाल्यानंतर अखेरीस शहरातील ९वी ते १२वी पर्यंतच्या शाळा सुरू केल्या आहेत. त्यामुळे नागपूर मधील शाळांची घंटा तब्बल नऊ महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा वाजली आहे.

आयुक्तांचे आदेश

नागपूर महापालिकेचे आयुक्त बी राधाकृष्णन यांनी गेल्या आठवड्यात शाळा सुरू करण्याबाबतचे आदेश शहरांतील शाळांना दिले होते. तत्पुर्वी त्यांनी शहरांतील शाळा व्यवस्थापनाशी चर्चा करून, सरकारने दिलेल्या कोरोनो संदर्भातील नियमांचे वेळोवेळी पालन करण्याचे निर्देश दिले होते.

नागपूर जिल्हा वगळता, विदर्भातील इतर शाळा या दिवाळीनंतर २३ नोव्हेंबर पासून सुरू करण्यात आल्या होत्या. तर, नागपूरच्या ग्रामीण भागांतील शाळा जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांच्या परवानगीनंतर, १४ डिसेंबर पासून सुरू करण्यात आल्या होत्या.

(हेही वाचा: कडक निर्बंधांमुळे चौथ्या कसोटीचे काय होणार?)

सक्ती नाही

कोरोनाच्या नवीन लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता, महापालिका प्रशासन शहरातील शाळांना परवानगी देण्यास अनिच्छुक होते. पण, आता नागपूर हेडमास्तर चॅरिटेबल असोसिएशनच्या माध्यमातून प्रशासनाच्या या निर्णयाचे मोठ्या प्रमाणात स्वागत होताना दिसत आहे. त्याबरोबरच, ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांना रोगाचा धोका लक्षात घेता विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणे शक्य नसेल, अशा विद्यार्थ्यांसाठी शाळेला हजेरी लावणे सक्तीचे नसल्याचे, प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ऑनलाईन माध्यमातून त्या विद्यार्थ्यांची शाळा ही सुरूच राहणार आहे.

नियमांचे काटेकोर पालन

विद्यार्थी ही आमची जबाबदारी आहे, त्यामुळे शाळेचा परिसर दररोज सॅनिटाईज करणे आणि सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करणे याकडे आमचे लक्ष असेल, असे असोसिएशनच्या वतीने सांगण्यात येत आहे. तसेच शासनाच्या स्टॅंडर्ड ऑपरेटींग प्रोसीजर्सचे पालन करण्यावर आमचा भर राहील असेही शाळेच्या मुख्याध्यापकांनी स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here