कोरोनाचा शाळांनाही बसला फटका, 20 हजारांहून अधिक शाळांना लागले कुलूप

140

कोरोना जागतिक महामारीमुळे संपूर्ण जग होरपळून गेले असताना त्याचे दुष्परिणाम देखील आता समोर येत आहे. कोरोनाचा दूरगामी परिणाम शिक्षण क्षेत्रावरही झाल्याचे दिसून येत आहे. कोरोना काळात देशातील 20 हजारांहून अधिक शाळांना कुलूप लागल्याची धक्कादायक माहिती एका अहवालातून समोर आली आहे. शिक्षकांच्या संख्येतही 2020 च्या आधीच्या तुलनेत जवळपास दोन टक्क्यांनी घट झाल्याचेही समोर येत आहे.

अहवालात माहिती समोर

युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन प्लस या संस्थेचा यूडीआयएसईपी अहवाल शिक्षण मंत्रालयाच्या वतीने जारी करण्यात आला आहे. पूर्वप्राथमिक वर्गातील साडेअकरा लाख विद्यार्थी 2020-21 या वर्षात प्रवेश घेऊ शकले नाहीत, असेही या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. डिजिटल लायब्ररी,पीअर लर्निंग,हार्ड स्पॉट आयडेंटिफिकेशन,शाळांच्या ग्रंथालयातील उपलब्ध पुस्तकांची यादी या निर्देशांकांवरुन माहिती गोळा करुन हा अहवाल तयार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

(हेही वाचाः सायरस मिस्त्रींच्या गाडीचा म्हणून झाला अपघात, गाडीत प्रत्यक्ष उपस्थित असणा-याने केला मोठा खुलासा)

अहवालातील महत्वाचे मुद्दे

2021-22 या वर्षात भारतात केवळ 44.85 टक्के शाळांमध्येच संगणक सुविधा उपलब्ध आहे. तसेच 34 टक्के शाळांमध्येच इंटरनेट जोडणी करण्यात आली आहे. दिव्यांग मुलांसाठी विशेष शौचालये असलेल्या शाळांचे प्रमाणही केवळ 27 टक्के असल्याचेही अहवालात म्हटले आहे. कोरोनाच्या दुष्परिणामांचाच हा फटका असल्याचेही बोलले जात आहे.

2021-22 या वर्षात प्राथमिक ते उच्च माध्यमिक वर्गांत 25.57 कोटी विद्यार्थी शिकत होते. 2020-21 च्या तुलनेत हे प्रमाण 19.36 लाखांनी घटले आहे. तसेच 2021-22 मध्ये देशात 95 लाख 70 हजार शिक्षक सेवा देत होते. 2020-21 मध्ये ही संख्या 97.87 लाख इतकी होती. या संख्येत सुमारे 1.95 टक्क्यांची घट झाली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.