१७ ऑगस्टपासून राज्यातील शाळा सुरू करण्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली होती. ‘चला मुलांनो शाळेत चला’, या अभियानांतर्गत ग्रामीण भागात ५वी ते ७ वी आणि शहरी भागात ८ वी ते १२ वी चे वर्ग सुरु करण्यास शिक्षण विभागाने परवानगी दिली. त्यामुळे शाळांमधील वर्ग भरण्यास आता सुरुवात होणार आहे. मुंबई उपनगर, ठाणे मध्ये शाळा सुरु करण्याबाबत परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय घेण्याचे सर्वाधिकार महापालिका आयुक्तांना दिले आहेत. त्याचबरोबर काळजीग्रस्त असलेल्या शहरांमधील शाळा सुरु करण्यासाठी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.
स्थानिक प्रशासनावर जबाबदारी
महापालिका क्षेत्रातील शाळा सुरु करण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून, यामध्ये वार्ड ऑफिसर, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी, शिक्षणाधिकारी शिक्षण निरिक्षक यांचा समावेश करण्यात आला आहे. तर नगरपंचायत नगरपालिका ग्रामपंचायतस्तरावर शाळा सुरु करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, वैद्यकीय अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक माध्यमिक) यांचा समावेश करण्यात आला असून या समित्या ग्रामीण आणि शहरी भागातील शाळांबाबत निर्णय घेणार आहे.
मार्गदर्शक सूचना
• शाळा सुरू करण्यापूर्वी कमीत-कमी एक महिना संबंधित शहर, गावात करोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असावा.
• शिक्षकांचे लसीकरण करणे आवश्यक. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे.
• गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या आवारात पालकांना प्रवेशास मनाई.
• जास्त विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रांत, एका बाकावर एक विद्यार्थी, दोन बाकांमध्ये सहा फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त १५-२० विद्यार्थी.
• मास्कचा वापर, साबणाने हात धुणे, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांला घरी पाठवून करोना चाचणी करून घेणे.
• विद्यार्थ्याला करोना संसर्ग झाल्यास तात्काळ शाळा बंद करून शाळा निर्जंतुक करावी. विद्यार्थ्यांचे विलगीकरण करून वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्याने उपचार सुरू करावेत.