दीड वर्षांनी शाळा भरली! शाळेच्या पहिल्या दिवसाचे फोटो इथे शेअर करा… शिक्षणमंत्र्यांचे आवाहन

शाळेतील हा पहिला दिवस कायम लक्षात राहावा यासाठी शिक्षण विभागाकडून एक अनोखा उपक्रम राबवण्यात येत आहे.

69

राज्यात गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळा सोमवारपासून सुरू झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांच्यात आनंद व उत्साहाचे वातावरण आहे. जरी गेले दीड वर्ष ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी आता शाळा सुरू झाल्याने मुलांचे शालेय जीवन लाईनवर आल्याची भावना त्यांच्यात आहे.

यासाठी सरकारतर्फेही शुभेच्छा देण्यात आल्या असून, विद्यार्थी व पालकांना सावध करण्यात येत आहे. शाळेतील हा पहिला दिवस कायम लक्षात राहावा यासाठी शिक्षण विभागाकडून एक अनोखा उपक्रम राबवण्यात येत आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली आहे.

फोटो, व्हिडिओ काढा आणि टॅग करा

शाळेतला पहिला दिवस कायम स्मरणात राहील असा घालवा, असे आवाहन वर्षा गायकवाड यांनी केले आहे. दीर्घ कालावधीनंतर उगवलेला हा दिवस उत्साहात साजरा करा. शाळेच्या पहिल्या दिवसाचे हे अनुभव आमच्यासोबत शेअर करा. त्यासाठी तुमचे फोटो किंवा व्हिडिओ बनवा, कविता रचा, गाणी गा आणि हे Thank You Teacher(@thxteacher) या ट्विटर खात्याला टॅग करुन पोस्ट करा, असे आवाहन वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थी व पालकांना केले आहे. तसेच यासाठी #शाळेचापहिलादिवस असा हॅशटॅगही वापरण्यात आला आहे.

 

शिक्षणमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

तसेच राज्यभरातील शाळा सोमवारपासून पुन्हा एकदा सुरू होत आहेत. यानिमित्ताने वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थी आणि पालकांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत. आजचा शाळेतील पहिला दिवस आपण सुरक्षित आणि आनंदित वातावरणात घालवाल, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

विद्यार्थ्यांना शाळेत पोषक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यासाठी राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर शिक्षण विभाग, आरोग्य विभाग व स्थानिक प्रशासन समन्वय साधतील, असेही त्यांनी ट्वीट करत सांगितले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.