गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या राज्यातील शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शालेय शिक्षण विभागाच्या या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा शाळांमधील घंटानाद ऐकायला मिळणार आहे.
म्हणून घेतला निर्णय
कोविड नियमांचे पालन करतच 4 ऑक्टोबरपासून राज्यात शाळा सुरू करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. याआधीही ऑगस्टमध्ये शाळा सुरू करण्याबाबत प्रयत्न करण्यात आला होता. पण त्यावेळी त्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. पण आता कोविड रुग्णांची कमी झालेली संख्या आणि बहुतांशी भागांतील शिक्षक व शालेय कर्मचा-यांचे पूर्ण झालेले लसीकरण यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
काय म्हणाल्या वर्षा गायकवाड?
शाळा सुरू करण्याबाबत राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री यांनी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळा सुरू करण्याच्या प्रस्तावाल मान्यता दिल्याचे त्यांनी सांगितले.
- ग्रामीण भागात 5 वी ते 12 वी व शहरी भागांत 8 वी ते 12वी पर्यंत शाळेचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.
- शाळेत येण्याची कुठल्याही विद्यार्थ्यावर सक्ती नसून, पालकांची संमती आवश्यक असणार आहे.
- कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करणे सर्व शाळांवर बंधनकारक असणार आहे.
- शाळेत कुठल्याही खेळांना परवानगी असणार नाही.
- शाळा सुरू करण्यासंदर्भातले सर्व निर्णय स्थानिक प्रशासनाकडे सोपवण्यात आले आहेत.
- जे विद्यार्थी शाळेत उपस्थित राहू शकत नाही त्यांचे शिक्षण बंद न राहता ऑनलाईन शाळा सुरू राहतील.
- प्रत्येक शाळेला आरोग्य केंद्राशी जोडण्याचे प्रयत्न करणार आहोत.