केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) गणेश मूर्तीची विक्री अथवा वापर यावर बंदी असली तरी यंदाच्या गणेशात्सवाकरता मूर्तिकारांनी मूर्ती बनवल्या असल्याने यंदा या पीओपीच्या मूर्ती विक्रीस परवानगी देण्याचा विचार सुरु आहे. याबाबतचा मसुदा लवकरच तयार करून प्रसिध्द केला जाणार आहे. दरम्यान, पर्यावरण हित लक्षात घेऊन शाडू मातीच्या गणेश मूर्तीची स्थापना करावी व पीओपी गणेश मूर्तीची विक्री अथवा खरेदी करु नये, असेही आवाहन महापालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
( हेही वाचा : ऑगस्ट क्रांतीकडे जाणाऱ्या सर्व मार्गांच्या पदपथांचे नुतनीकरण; देखभालीसाठी तीन वर्षांचे कंत्राट, मोजणार अतिरिक्त २ कोटी रुपये)
यंदा पीओपीच्या मूर्तीला परवानगी देण्याचा विचार
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या दिनांक १२ मे २०२० च्या नियमावलीनुसार प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती वापरास / विक्रीस बंदी आहे, त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तीची विक्री किंवा खरेदी करु नये. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात शाडू मातीच्या मूर्ती बनवणे बंधनकारक केले जाणार होते, परंतु आगामी गणेशोत्सवाकरता मूर्तिकारांनी गणेश मूतींच्या कामाला सुरुवात केल्यानंतर यंदाच्या वर्षी पीओपीच्या मूर्ती बनवण्यास परवानगी दिली जावी अशी मागणी मूर्तिकार संघटनांकडून केली जात होती. या मागणीचा विचार करत महापालिका प्रशासन यंदा पीओपीच्या मूर्ती विक्री व खरेदीला परवानगी देण्याचा विचार करत आहे. त्यामुळे लवकरच याबाबचा दिलासा मूर्तिकारांना मिळण्याची शक्यता आहे.
गणेश मूर्तीची उंची २ फुटापेक्षा अधिक नसावी
दरम्यान, महापालिका प्रशासनाने प्रसिध्दी पत्रक जारी करून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) गणेश मूर्तीची विक्री अथवा वापर यावर बंदी आहे. तसेच पीओपी मूर्ती विसर्जनामुळे जल प्रदूषणही होते. त्यामुळे पर्यावरण हित लक्षात घेऊन यंदा गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसने घडवलेल्या गणेश मूर्तीची विक्री अथवा खरेदी करु नये, त्याऐवजी शाडू मातीची गणेश मूर्ती स्थापन करावी, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. तसेच कृत्रिम तलावांमध्ये घरगुती गणेश मूर्ती विसर्जित करणे सोयीस्कर व्हावे, यासाठी घरगुती गणेश मूर्तीची उंची २ फुटापेक्षा अधिक नसावी, अशी विनंतीही महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community